महाराष्ट्र निवडणूक 2019: 'आघाडीच्या बैठकीनंतर पर्यायी सरकारबाबत निर्णय'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 02:49 AM2019-11-18T02:49:21+5:302019-11-18T06:18:49+5:30
नवाब मलिक यांची माहिती
पुणे : लवकरात लवकर एक पर्यायी सरकार निर्माण झाले पाहिजे, या निष्कर्षावर आम्ही पोहचलो आहोत. हे पर्यायी सरकार देण्यासाठी काँग्रेसबरोबर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी रविवारी दिली.
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. मलिक म्हणाले, बैठकीत महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली़ सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे भेटणार असून, या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होईल.
दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मंगळवारी राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल व सरकार स्थापनेबाबतची पुढील भूमिका ठरविली जाणार असल्याचे मलिक म्हणाले़ पुण्यातील बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, हसन मुश्रिफ, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते़ सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीनंतर पवार दिल्लीकडे रवाना झाले.