पनवेल : दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. तशीच साफसफाई महाराष्ट्रातून काँग्रेसची करा. दिवाळीपूर्वी येत्या २१ तारखेला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत भाजपाला बहुमत देऊन काँग्रेसची महाराष्ट्रातून साफसफाई करा, असं विधान केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी खारघरमध्ये आज पार पडलेल्या गुजराथी समाजाच्या सभेदरम्यान केले. खारघर शहरातील लिटलवर्ल्ड मॉल येथील सभागृहात पनवेल विधान सभेचे भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत रुपाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रात स्थिर सरकार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. गुजरातमध्ये अनेक वर्षापासून स्थिर सरकार असल्याने आज देशभरात गुजरात मॉडेल प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आली. कच्छसारख्या दुष्काळी भागात मोदी सरकारने पाणी आणले. आज गुजरातच्या विकासाचे मॉडले देशभरात ओळखले जाते, असे रुपाला म्हणाले.स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. मोदींमुळे भारताचे नाव आंतराष्ट्रीय पातळीवर मोठे झाले आहे. यूपीए सरकारच्या काळात विकासकामे थांबली होती. नर्मदा धरणाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंडित नेहरूंनी केले. मात्र त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदींनी केले. पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागे सर्वानी उभे राहा. त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान करुन भाजपाची ताकद वाढवा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.आमदार प्रशांत ठाकूर यांनीदेखील पनवेल विधानसभा क्षेत्रातील पाणी, वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सुटणार आहे. कोस्टल रोडचे काम लवकरच सुरु होईल तसेच पाण्याची समस्या देखील लवकरच मार्गी लागणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी देशात नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र हा नारा दिला आहे. त्यामुळे सर्वांनी भाजपाला मोठ्या संख्येने विजयी करावे, असे ठाकूर म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये गुजरातचे माजी गृहमंत्री गोवर्धन जडाफिया, गुजरातचे माजी मंत्री जयंतीभाई कवाडीया, नगरसेवक रामजीभाई बेरा, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, वाकडलेवा पाटीदार समाजाचे भांजीभाई पटेल, युवा नेता वैभव नाईक, आंबाभाई पटेल, बिना गोगरी यांच्यासह सौराष्ट्र लेवा पाटीदार समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Maharashtra Election 2019: 'काँग्रेसला महाराष्ट्रातून कचऱ्यासारखं साफ करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 9:52 PM