महाराष्ट्रातील सत्तास्थापनेची कोंडी कधी फुटणार, भाजपा आणि शिवसेनेचं सूत कधी जुळणार की नवंच राजकीय समीकरण पाहायला मिळणार, या प्रश्नांची उत्तरं निकालाला दहा दिवस होऊनही मिळायला तयार नाहीत. कारण, ज्या महायुतीला जनतेनं बहुमताचा कौल दिला, त्यातलेच दोन भाऊ मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेत. शिवसेना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी सोडायला तयार नाही आणि असं काही ठरलंच नव्हतं, या भूमिकेवर भाजपा ठाम आहे. त्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत भाजपावर रोज नवे 'बाण' सोडत आहेत. त्याला भाजपा नेतृत्वाकडून प्रत्युत्तर दिलं जात नसल्यानं, ते 'बॅकफूट'वर गेलेत की काय, देवेंद्र फडणवीस एकटे पडले आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत जाऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर चित्र बदललं आहे आणि भाजपा 'फ्रंटफूट'वर खेळू लागल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्रिपद देणार नाही म्हणजे नाही, असंच अमित शहा - फडणवीस बैठकीत पक्कं झाल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यामुळे आता शिवसेनेवरचा दबाव वाढणार आहे.
सरकार नक्की स्थापन होईल असं मुख्यमंत्री म्हणाले; पण 'मुद्द्याचं' नाही बोलले!
संजय राऊतांपाठोपाठ महायुतीतील रामदास आठवलेही घेणार शरद पवारांची भेट, कारण...
विधानसभा निवडणूक निकालानंतर पदं आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करण्यात येईल, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या घोषणेवेळी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्याचाच आधार घेत, शिवसेना अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद मागतेय. परंतु, पदं आणि जबाबदाऱ्या यामध्ये मुख्यमंत्रिपद येत नाही आणि मुख्यमंत्रिपदाच्या समसमान वाटपाचा शब्द आपण शिवसेनेला दिलेला नाही, यावर आज शाह-फडणवीस भेटीतही शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून समजतं. म्हणजेच, भाजपा 'नाय नो नेव्हर'वर शत प्रतिशत ठाम आहे आणि चेंडू पुन्हा सेनेच्या कोर्टात गेला आहे.
'उदयनराजे होण्याच्या भीतीनं एकही आमदार फुटणार नाही'
'इथं माझंच मला पडलंय अन् तुम्ही मलाच विचारा, सरकार कुणाचं येणार'- उदयनराजे
महाराष्ट्रात नवं सरकार नक्की स्थापन होईल आणि आम्ही त्याबाबत आश्वस्त आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आत्मविश्वासाने सांगितलं. त्यात त्यांनी ना शिवसेनेचा उल्लेख केला, ना महायुतीचा. सरकार स्थापनेबाबत अनेक जण बोलत आहेत, पण भाजपाचे नेते काही बोलणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेनेला अवाजवी महत्त्व न देण्याचा किंवा अनुल्लेखाने मारण्याचा भाजपाचा फंडा असल्याचं दिसतंय.
शिवसेनेचे 20 ते 25 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; आमदाराचा खळबळजनक दावा
'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा'
भाजपा आपल्या मदतीशिवाय सरकार स्थापन करू शकत नाही, असा निकाल लागल्यानं शिवसेनेनं आपली मागणी मुख्यमंत्रिपदाची लावून धरलीय. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षं वाटून घेण्याचं ठरलं नव्हतं, मुख्यमंत्रिपदावर तडजोड होऊच शकत नाही, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीदरम्यान स्पष्ट केली. तेव्हापासून दोन भाऊ एकमेकांची तोंडंही पाहायला तयार नाहीत. युतीतील चर्चा ठप्प असली, तरी संजय राऊत एकदम फॉर्मात आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवतीर्थावर शपथ घेणार, १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, राज्यपालांची भेट घेणार आहोत, मुख्यमंत्र्यांचा चेहरा थकल्यासारखा वाटतोय, लोकसभेवेळी जे ठरलं होतं ते मान्य करा, अशा डरकाळ्या ते रोज फोडत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेऊन, अजित पवारांना मेसेज पाठवून ते भाजपावर दबाव वाढवताना दिसताहेत. त्यावर भाजपानं कुठलीही प्रतिक्रिया न देणं, हे ठरवून केलं जात असल्याचंच आज स्पष्ट झालं आहे.