देशात, राज्यात सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असून ती थांबविण्यासाठी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचे मत व्यक्त करून हा विरोधी पक्ष उभा करण्यासाठी मला साथ द्या, असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभांमधून केले आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही कामावर राज ठाकरे समाधाना नाहीत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काम दिसत नसल्याचं म्हटलंय.
राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पाच वषार्पूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सांगून आपल्या जाहिरनाम्यात भाजप, शिवसेनेने कोणकोणती वचने दिली होती, त्याचा पाढाच राज आपल्या सभांमध्ये वाचत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना, मुख्यमंत्री चांगला माणूस, भला माणूस आहे. या राज्याने गिनेचुने चांगले मुख्यमंत्री पाहिले. त्यापैकी एक म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहता येईल. पण, लोकं भरभरून मतं देताहेत, मग कामं करा ना. सध्या लोकांच्या अपेक्षेएवढी कामं होताना दिसत नाहीत. सरकारने विश्वास, दिलासा, हमी दिली पाहिजे. नरेंद्र मोदींबद्दल माझं मत होतं, आजही आहे. ज्या गोष्टींसाठी सत्ता दिली, त्या राबवायला काय जातंय? असा प्रश्नही राज यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत उपस्थित केला आहे.
विरोधी पक्ष उपयोगाचाच नव्हता, शिवसेना-भाजपाचंही जे चालू होतं ते काय चालू होतं. राजीनामे खिशात ठेवलेत, थट्टा लावलीय का? जबाबदार राज्य, जबाबदारीने चालवायला दिलंय, ते फालतुपणा करण्यासाठी आहे का? असे म्हणत सत्ताधारी आणि विरोधकांवरही राज ठाकरेंनी सडकून टीका केली.