यदु जोशी
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरात राजकीय पक्षांच्या धडाडत असलेल्या प्रचारतोफा आज थंडावणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांना शरद पवार या निवडणुकीनंतर राजकीयदृष्ट्या संपतील? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर 'असं कोणी संपत नसतं पण, सत्तेचा उपयोग करून सत्ता आणायची, सत्तेसाठी काहीही करायचं हा गेल्या काही वर्षांत पवारांनी आणलेला भ्रष्ट संस्कृतीचा पॅटर्न संपेल. तो लोकांना पसंत पडेल असं वाटत नाही' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या घोटाळ्यांशी संबंधित काही निर्णय हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्देशांनुसार, पत्रांनुसार घेण्यात आले होते, असा खळबळजनक आरोपही फडणवीस यांनी केला. 'राज्य बँकेत घोटाळे तर झालेच आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये पवार यांच्यासह सर्वांची नावे आहेत. त्यात त्यांची भूमिका काय होती, कोणते कलम लागतात हेही लिहिलंय. त्यामुळे ईडीच्या चौकशीत पवारांचे नाव आले. ईडीच्या कारवाईचे ते राजकीय भांडवल करताहेत पण या घोटाळ्याचा ऑडिट रिपोर्ट बघितला तर अनेक ठिकाणी सुस्थितीतील साखर कारखाने काही कारणांनी तोट्यात आणले गेले आणि नंतर विकायला काढले. सरकारची सर्व देणी या कारखान्यांनी द्यावीच लागतील असे सांगून कारखाने लिलावात काढणयत आले. काही लोकांनी कवडीमोलाने कारखाने मिळविले आणि मग तत्कालिन आघाडी सरकारचा वापर करून सरकार, बँकेची देणी रद्द करवून घेतली. हा एक घोटाळाच आहे. ज्या ठिकाणी हे घडलं तिथे थेट कनेक्शन हे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आहे; त्यातील नेते हे शरद पवार यांच्याशी संबंधित होते. या घोटाळ्यांशी संबंधित जे ठराव राज्य बँकेत तेव्हा बसलेल्या त्यांचे चेले हुशार निघाले. त्या चेल्यांनी मंजूर केलेल्या ठरावांत, ‘मा.कृषी मंत्री पवारसाहेब यांच्या निर्देशांनुसार ठराव घेण्यात येतो की’ असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. मग पवारसाहेबांचे नाव घोटाळ्यात येईलच ना. या घोटाळ्यात त्यांचे नाव का घेतले जात आहे यासंबंधी मी माहिती घेतली असता ‘हॉर्सेस माऊथ’कडून मला हे सगळे कळाले. आता चौकशी यंत्रणांच्या चौकशीतून ही बाब समोर येईलच' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीत चुरस नाही असं म्हणता तर पंतप्रधानांसह एवढा फौजफाटा का उतरवला भाजपने?
पंतप्रधानांच्या अधिक सभा व्हायला हव्या होत्या, असे मला वाटते. मतदारांना गृहित धरणे योग्य नाही. तुम्ही तसे केले तर मग मतदारही तुम्हाला गृहित धरू शकतील. आमच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सरकारसाठी अनुकूल असे वातावरण आहे. निकालात ते दिसेलच.
राज ठाकरेंना विरोधी पक्षाची तरी भूमिका मिळेल का?
- मला वाटते की राज अधिक प्रक्टिकल आहेत. मला सत्ता द्या असं म्हणणं प्रासंगिक नाही हे लक्षात आल्यानं त्यांनी विरोधी पक्षाचा मार्ग पत्करला. विरोधी पक्षांची विश्वासार्हता आज कधी नव्हे एवढी घसरली आहे. त्याचा फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो पण मतदार त्यांना ती भूमिकाही देतील असे वाटत नाही. लोकसभेला त्यांनी जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला तिथे आघाडीचा पराभवच झाला होता. बारामतीकडून त्यांचा वापर होतोय हे आम्ही त्यावेळी सांगत होतो पण त्यांना ते पटत नव्हते. आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालविल्या जाताहेत हे कदाचित आता त्यांना कळलं असणार.
भाजप-शिवसेनेच्या बंडखोरांचा कितपत फटका बसेल? भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात काही महत्त्वाच्या जागा गमावणार असं म्हटलंय?
- बंडखोर अनेक ठिकाणी आहेत पण लोक चिन्ह पाहून महायुतीलाच मतदान करतील हा माझा विश्वास आहे. बंडखोरांचा मोठा त्रास होणार नाही. चॅनेल्सवर जो दाखवताहेत तसा कुठलाही सर्व्हे झालेला नाही. जो झालाय त्याची माहिती मी नंतर देईन पण तो ‘एन्करेजिंग’ आहे. माण आणि कणकवलीत भाजप-शिवसेना आमनेसामने आहेत. या दोन्ही जागा भाजपच जिंकेल.
नितीन गडकरी यांना प्रचारात विदर्भापुरतंच मर्यादित ठेवलंय असं म्हटलं जातं?
- विदर्भाच्या बाहेरही त्यांनी सभा घेतल्या पण त्यांनी स्वत:च विदर्भावर जास्त लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलंय. ‘तू तिकडे व्यग्र आहेस तर मी इकडे सांभाळतो, असं त्यांनीच मला म्हटलं. माझ्या मतदारसंघात त्यांनी चार सभा घेतल्या.
तुम्ही केंद्रात जाणार अशी चर्चा नेहमीच असते?
- मला माझा पक्ष सांगेल त्याक्षणी मी दिल्लीत जाईन. उद्या पक्षानं म्हटलं घरी बस तर घरी बसेल.आता जेवढं मला राजकारण समजत त्यानुसार माझी राज्यात गरज आहे. पक्षालाही वाटतं की मी महाराष्ट्रातच राहावं. त्यामुळे मी इथे आहे आणि राहीन.
बावनकुळे, खडसे असोत की तावडे यांची तिकीटं कापताना त्यांची मानहानी झाल्याचे चित्र टाळता आले नसते का?
- तो निर्णय माझा नव्हता. पक्षाच्या संसदीय मंडळाने तो घेतला आणि मी त्याचा सदस्य नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी त्यांची एकेकट्याची नावे संसदीय मंडळाकडे पाठविली होती पण संसदीय मंडळाने वेगळा विचार केला.
जातीच्या राजकारणाचा आपल्याला त्रास झाला?
- राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच मला सर्व जातीधर्मांच्या लोकांनी स्वीकारले. जात ही जनतेच्या मनात नसते ती राजकारण्यांच्या मनात असते. लोकांच्या मनात जात असती तर राज्यात आरक्षणावरून मोठे आंदोलन सुरू असताना आम्ही सगळ्या निवडणुका जिंकलोच नसतो. राजकीय नेते जातीची ढाल मतलबासाठी वापरतात. आरक्षणाचा टक्का वाढल्याने राज्यातील काही समाजांमध्ये अन्यायाची भावना आहेच. ती निश्चितपणे दूर केली जाईल आणि त्यासाठी २०१८ पूर्वी खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या बहाल केल्या जातील आणि त्या वेळोवेळी वाढविल्या जातील.
मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली तर आगामी पाच वर्षांसाठी आपला फोकस कशावर असेल?
- दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे माझे मिशन असेल. समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणले जाईल. त्याद्वारे आणि नदी जोड प्रकल्पाद्वारे उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा दुष्काळमुक्त केला जाईल. वैनगंगेतूच दीडशे टीएमसी पाणी तेलंगणामागे समुद्रात जातं. ते ४८० किलोमीटरच्या बोगद्यातून थेट बुलडाणा जिल्ह्यापर्यंत नेले जाईल. तापी मेगा रिचार्ज या सहा हजार कोटी रुपयांच्या योजनेतून चार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाईल. पश्चिम महाराष्ट्रात पुराचा धोका संपवून कोयना, कृष्णेतून दरवर्षी वाहून जाणारं पुराचं पाणी कृष्णा-भीमा स्थिरीकरणसारख्या योजनांमध्ये आणलं जाईल. मराठवाडा ग्रीडअंतर्गत ११ धरणांतील पाणी मराठवाड्याला दिले जाईल. मराठवाड्यात नवीन धरणं होणार नाहीत असा निर्णय २००८ मध्ये घेण्यात आला होता. आता आम्ही तो बदलणार आहोत. या योजना पूर्ण होण्यासाठी पाच ते सात वर्षे लागतील पण त्यानंतर राज्य कायमचे दुष्काळमुक्त होईल. गेली पाच वर्षे वैद्यकीय सहाय्यतासारख्या योजनांद्वारे सरकारला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न झाला. ही योजना आणि अन्य अशा योजना वेळोवेळी राबविण्यात येतील.
दहा रुपयांत थाळी, एक रुपयात आरोग्य तपासणीसारखी शिवसेनेनी दिलेली आश्वासने आपल्याला योग्य वाटतात का आणि राज्याच्या तिजोरीस परवडतील का?
- शिवसेनाही गेली पाच वर्षे सत्तेत आहे आणि त्यांना सरकारच्या क्षमता व मर्यादांची जाण आहे. त्यामुळे ही आश्वासने देताना त्यांनी तो विचार केलाच असेल. माझी अद्याप त्यांच्याशी या बाबत चर्चा झालेली नाही. समाजातील ज्या घटकांना खरेच गरज आहे त्यांना अशा सुविधा दिल्या जाऊ शकतात.
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या
Exclusive: ...म्हणून महाराष्ट्रात मोदींच्या एवढ्या सभा घेतल्या; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं (राज)कारण
Exclusive: नारायण राणे-उद्धव ठाकरे 'युती'साठी मुख्यमंत्री करणार मध्यस्थी, कारण...
Exclusive: बारामतीची 'ती' खेळी राज ठाकरेंना आता कळली असेल; मुख्यमंत्र्यांचा टोला
''राज्य बँकेच्या घोटाळ्यात शरद पवार यांचा संबंध''