मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवस उलटले तरी राज्यात कोणाचं सरकार येणार याबाबत सभ्रम निर्माण झाला आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढलेले भाजपा-शिवसेना यांना बहुमत मिळालं मात्र मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु आहे. अशातच राज्याची विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच राज्यात अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील या सत्तास्थापनेच्या तिढा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना सोशल मीडियावर मात्र यावरुन विनोदाचा धुमाकूळ माजला आहे. अनेक मीम्सच्या माध्यमातून सत्तास्थापनेवर भाष्य केलं जातं आहे. फेसबुक, ट्विटरवर अनेकजण नानाप्रकारचे जोक्स व्हायरल करत आहेत. मात्र या सगळ्यात सरस ठरलंय ते म्हणजे महाराष्ट्रातील राजकारण ज्या नेत्यांच्या भोवती फिरतं अशा नेत्यांचा एक व्हॉट्सग्रुप. सध्या व्हॉट्सअप हे असं माध्यम आहे ज्यामध्ये एकाच ग्रुपमध्ये अनेक जण एकाचवेळी चर्चा करु शकतात. अनेक संस्था, राजकीय पक्ष, कार्यकर्ते या ग्रुपच्या माध्यमातून सत्तास्थापनेवर भाष्य करत असतात. पण समजा जे लोकं या निर्णय प्रक्रियेचा भाग आहेत. त्या नेत्यांच्या ग्रुपवरदेखील सत्तास्थापनेवर चर्चा सुरु असेल तर हे नक्कीच तुम्हाला वाचायला गमंत वाटेल.
या ग्रुपमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेसचे संजय निरुपम, भाजपाच्या पंकजा मुंडे इतकचं नव्हे तर खुद्द भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही या ग्रुपमध्ये काहीकाळ समावेश करण्यात येतो.
या ग्रुपमध्ये सत्तास्थापनेवर चर्चा होत असताना उद्धव ठाकरेंकडून भाजपावर आणलेला दबाव, राष्ट्रवादीकडून शिवसेनेला सत्तास्थापनेची ऑफर तर सुप्रिया सुळेंकडून ईडी अन् सीबीआयचा सरकारकडून होणार गैरवापर यापासून सर्व मुद्द्यांवर भाष्य होताना दिसत नाही. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा राज्यात भाजपासाठी असो वा सर्वच राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय बनलेला असताना सोशल मीडियात मात्र या घडामोडींना विनोदाचं स्वरुप प्राप्त झाल्याचं दिसतं.