भाजपा सरकारच्या काळात फसवी कर्जमाफीमुळे राज्यात 16 हजार शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारकडे कोणतेही आस्थान नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. अहमदनगरमध्ये शरद पवारांची पहिल्या जाहीर प्रचार सभेत भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले की, सरकारने शेतकरी आणि उद्योगांचे मोठे नुकसान केले आहे. तसेत सरकारच्या अनेक धोरणामुळे राज्यातील कारखाने बंद पडल्याने लोकांना आपले रोजगार गमवण्याची वेळ आली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे अशा लोकांना मतदानासाठी दारतही उभे करु नका असं आवाहन शरद पवारांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली असताना केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही सत्तेत असताना आम्ही एकाच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत होतो, पण आताच्या सरकारने अनेक विमा कंपन्या काढून सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही, अशा सरकारला चांगला धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे आमचे सरकार सत्तेवर आल्यावर शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
विजयादशमीनिमित्त पारनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते आज (मंगळवारी) झाला. यावेळी पवार पुढे म्हणाले, या निवडणुकीत उमेदवाराला लोक आर्थिक मदत करतात हे मी पहिल्यांदाच पाहिले आहे. तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी पारनेरला मी एमआयडीसी सुरू केली. पारनेरमध्ये मी लंके यांच्या रुपाने सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार दिला आहे. त्यांना संधी द्या. पाणी प्रश्नांसह विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या माध्यमातून यापुढील काळात प्रयत्न केले जातील असं आश्वासन देखील शरद पवारांनी नागरिकांना केलं.