मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, सोमवारच्या मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून सायंकाळी ६ वाजेपूर्वी मतदान केंद्राबाहेरील मतदान रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. परिणामी अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
राज्यभरात मतदार जागृतीसाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले असून, मानवी साखळी, दिव्यांगांची रॅली, गीत, वक्तृत्व स्पर्धा, फ्लॅशमॉबद्वारे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी होणाºया विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने आवश्यक ओळखपत्रांची यादी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसल्यास ११ पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरला जाईल. दरम्यान, सर्व मतदान केंद्रावर पुरुष व महिला मतदारांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार मदत केंद्राची व्यवस्था आहे. मतदान केंद्रावर प्रथमोपचार, पिण्याचे पाणी व शौचालय यांची सुविधा आहे. मतदारांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक इत्यादी सुविधा असणार आहेत. तसेच मतदान केंद्रांच्या ठिकाणी बाल संगोपन केंद्रांची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्यांग मतदारांकरिता व्हीलचेअर्सचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर येणे व मतदानानंतर घरी परत जाणे सुलभ व्हावे, यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग मतदारांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी पर्सन विथ डीसएबिलिटीज या अॅपवर नोंदणी केल्यास त्यांना मतदान करण्यासाठी घरून येण्यासाठी व मतदान केल्यानंतर घरी परत जाण्यासाठी वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मतदारांसाठी घोषवाक्ये
मतदारांसाठी घोषवाक्ये
आपले मत म्हणजे आपले स्वातंत्र्य. २१ ऑक्टोबर, २०१९ लक्षात असू द्या. अवश्य मतदान करा.
लोकशाही अधिक बळकट करण्याची संधी गमावू नका. मतदान अवश्य करा.
मतदान म्हणजे आपला आवाज. लोकशाही बळकटीकरणातील आपला सहभाग.
मतदान करणे हे सोपे आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी कोणतेही कारण देऊ नका.
आपल्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदाराचे कर्तव्य आवर्जून बजावा.
उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही करणार मतदान. तुम्ही देणार का आमची साथ.
मी लोकशाहीचा शिल्पकार, मतदान करण्याची अमूल्य संधी घालवू नका. तुमचे मत तुमचा अधिकार.
मतदानासाठी ईव्हीएमपेक्षा जास्त सुरक्षित आणि चांगला पर्याय असूच शकत नाही.
सुजाण नागरिकाचे कर्तव्य बजावा. मतदानाचा दिनांक लक्षात ठेवा.
मतदान करणे तर सेल्फी काढण्यापेक्षाही सोपे आहे.