मुंबई : भाजपा, शिवसेनेसह राष्ट्रवादीही सरकार स्थापनेस असमर्थ ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. आज अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषद घेत भुमिका मांडली. राज्यपालांनी आपल्याला निमंत्रण न दिल्याची खंत काँग्रेसने व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारशीवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यावर आधी आमचे ठरूद्या नंतर शिवसेनेचा विचार केला जाईल असे सांगितले. तसेच काँग्रेसचे आमदार जयपूरला ठेवणार का या प्रश्नावर त्यांनी बरेचशे आमदार राज्यात परतले असल्याचे सांगताना त्यांना हॉटेलवर ठेवणार नसल्याचे म्हटले आहे.
राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपाला, शिवसेनेला बोलावले. त्यांनतर राष्ट्रवादीला बोलावले पण काँग्रेसला बोलावले नाही, असेही पटेल म्हणाले.