मुंबईः राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसताना, बहुमत जिंकलेले भाजपा आणि शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेले असताना राज्याचे माजी सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी हाच धागा पकडत नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार हे तिघंही मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नसल्याचं मत मांडून त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
महाराष्ट्रात कम्युनिटी पोलिसिंगची सुरुवात करणारे अधिकारी आणि लेखक म्हणून सुरेश खोपडे यांची ओळख आहे. १९९२ च्या दंगलीत भिवंडीसारख्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान त्यांनी समर्थपणे पेललं होतं. त्यातून त्यांचा अनुभव, प्रशासकीय जाण आणि कार्यक्षमतेचा सहज प्रत्यय येतो. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत फेसबुकवर लिहिलेल्या पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
'शिवसेना अडून राहिली तरच मुख्यमंत्रिपद मिळेल'
भाजपानं उपसलं शेवटचं अस्त्र; शिवसेनेला थंड करण्यासाठी 'सर्वोच्च' इशारा
सुरेश खोपडे लिहितात, 'देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले, हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राज्याला भूतकाळाकडे घेऊन चाललेले नेते आहेत. एकनाथ शिंदे हे पुराणमतवादी, शिवसेना स्टाईलने म्हणजे दडपशाहीने काम करणारे नेते वाटतात, तर अजित पवार हे अहंकारी व सरंजमदारी पद्धतीने काम करणारे राजकारणी आहेत. त्याऐवजी, २१व्या शतकाचा वारा हुंगलेली, जागतिकीकरणाची चव चाखलेली, रंगाच्या झेंड्याने नजर कलुषित न झालेली व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसावी असं वाटतं.'
अजित पवारांचा 'तो' निर्णय फसला; संजयमामा पुन्हा भाजपसोबत
विखेंचं नेटवर्क कमी पडलं ? टळला नाही 'या' नेत्यांचा पराभव !
आजच्या स्थितीत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे किंवा रोहित पवार हे दोघं मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य असल्याचं सुरेश खोपडे यांनी नमूद केलं आहे. बाकीचे नेते आहे ती व्यवस्था तशीच ठेवून स्वार्थ साधण्यासाठी या पदाचा उपयोग करतील, पण 'आऊट ऑफ बॉक्स थिकिंग' करणाऱ्यांची आज खरी गरज आहे, ते काम तरुणच करू शकतात, जुन्या खोडांचे काम नाही, असं स्पष्ट मत खोपडे यांनी मांडलं आहे.
अर्थात, मुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरणाऱ्या शिवसेनेत आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरूच आहे. परंतु, भाजपा हे पद सेनेला द्यायलाच तयार नाही. त्याऐवजी उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादीने विरोधात बसण्याची भूमिका जाहीर केल्यानं रोहित पवार यांचं नाव सध्यातरी कुठल्याच पदाच्या शर्यतीत नाही.