Maharashtra Election 2019: वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 05:29 PM2019-10-10T17:29:09+5:302019-10-10T17:30:19+5:30
वैजापूर विधानसभा निवडणूक २०१९ - मी बोलण्यासाठी नाही आलेलो मी सरकार आणून काम करण्यासाठी आलेलो आहेत.
वैजापूर - शरद पवारांबाबत आमची इच्छा आहे तुम्ही कधीच स्वस्थ बसू नका. कारण सरकार कधी जाणारच नाही. शरद पवारांना सरकार घालवण्याचा अनुभव आहे. स्वतःच्या पक्षाचे वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बोलण्यासाठी नाही आलेलो मी सरकार आणून काम करण्यासाठी आलेलो आहेत. काही बोलघेवडे लोक आघाडी सोबत फिरत आहे त्यांना करू द्या. आम्हाला काहीतरी घ्यायचे म्हणून नाही तर काहीतरी द्यायचं म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. मतदार संघात भरपूर इच्छुक कार्यकर्ते असणं हे पक्षाचे वैभव आहे. सर्व इच्छुकांना मी धन्यवाद देतो उमेदवारी दिल्यानंतर सर्वांनी आपल्या इच्छा बाजूला ठेवून एकत्र आलेले आहेत. दोन पक्ष असले तरी विचार एक आहे. भगवा एक आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तान आम्हाला भगवा करायचा आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच राम मंदिर हा मुद्दा आहे मात्र आम्हाला माणुसकीने कारभार करण्यासाठी आहे. महायुतीचा यज्ञ आपण राष्ट्रभर पेटवलेला आहे. माणसे शरीराने नाही तर मनाने वृद्ध होतात. इथला प्रकल्प अजून मार्गी लागलेला नाही. बेरोजगारांना काम का नाही? बेकराना आम्ही भत्ता देऊ. तरुणांना भत्ता नको त्यांना काम हवे आहे. मेहनत करणारा हा महाराष्ट्र आहे आम्ही त्या तरुणाला काम देऊ, तरुणांना उद्योगधंदे उपलब्ध करून देऊ. भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या मिळवून देऊ. आपला स्वतःचा हक्काचा माणूस किंवा परका माणूस यामध्ये बराच फरक आहे. असं सांगत उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.
दरम्यान, आम्ही नेहमी काम करत राहणार आम्ही कधीच स्वस्थ बसू शकणार नाही याला म्हणतात शिवसेना आणि मित्रपक्ष. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील सर्व कर्ज माफ केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे. काँग्रेसच्या कोणत्या नेत्यावर टीका करायची हेच कळत नाही कारण समोर कोणीच दिसत नाही. सुशीलकुमार म्हणतात राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेपण थकले. इतकी वर्षं सत्तेत होते खाऊन खाऊन थकले. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणतात की आम्हाला आमचे भविष्य आम्हाला माहीत नाही. त्यांना स्वतःचे भविष्य माहीत नाही ते आपले भविष्य काय घडवणार? असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. ही निवडणूक आता जनतेने हातामध्ये घेतली आहे जनता ठरणार आहे की महाराष्ट्रमध्ये कोणाचे सरकार येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे हा माझा महाराष्ट्र आहे तुमचा महाराष्ट्र आहे असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.