भाजपाने 'लिंबू फिरवलं'; आता विरोधक पुन्हा 'झपाटणार' की नवी 'करणी' करणार?
By अमेय गोगटे | Published: October 10, 2019 02:57 PM2019-10-10T14:57:56+5:302019-10-10T15:01:42+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार 'लिंबू' या बहुगुणी फळाभोवती केंद्रीत झाल्याचं पाहायला मिळतंय.
>> अमेय गोगटे
काँग्रेसचे एक तरुण-तडफदार नेते नुकतेच भेटले. राज्यातलं वातावरण कसं वाटतंय, या प्रश्नावर 'वातावरण बदलतंय' म्हणाले. त्याचा फायदा तुम्ही कसा करून घेणार, काय स्ट्रॅटेजी आहे, असं विचारताच ते एकदम मुद्द्याचं बोलले. 'मुद्दे धरून प्रचार करणं आवश्यक आहे', असं मत त्यांनी मांडलं आणि ते अत्यंत अचूक म्हणावं लागेल. कारण, गेल्या काही वर्षांतील निवडणुकांच्या प्रचारात भाजपाने एक वेगळाच 'अजेंडा' सेट केल्याचं आणि विरोधक त्याभोवतीच पिंगा घालत राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. थोडक्यात, मूळ मुद्द्यांपासून विरोधकांना भरकटवण्याची खेळी भाजपाने केली आणि ते त्यात यशस्वीही झालेत. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार 'लिंबू' या बहुगुणी फळाभोवती केंद्रीत झाल्याचं पाहायला मिळतंय.
लोकसभा निवडणुकीत राफेल घोटाळ्याचा मुद्दा घेऊन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वातावरण तापवलं होतं. 'चौकीदार चोर है'चा नारा देशभरात पोहोचत होता. राफेलचा विषय जनसामान्यांना भिडणारा होता का, हा मुद्दा वेगळा; पण या मुद्द्यावर फोकस करून बेरोजगारी, महागाईचा मुद्दाही विरोधक मांडत होते. दुसऱ्या बाजूला, मोदी सरकार एअर स्ट्राईक आणि प्रखर देशभक्ती या दोन अस्त्रांचा प्रभावी वापर करत होतं. अशातच, माजी पंतप्रधान राजीव गांधींनी INS विराट या युद्धनौकेचा मनोरंजनासाठी वापर केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आणि गांधी कुटुंबाचे निष्ठावंत नेते पुढचे काही दिवस तो एकच मुद्दा घेऊन बसले.
त्यानंतर, अभिनेता अक्षय कुमारने नरेंद्र मोदींची मुलाखत घेणं, त्यातील प्रश्नांचं स्वरूप, अक्षय कुमारचं नागरिकत्व, मोदींचा स्टंट या चर्चांनी सोशल मीडिया ढवळून निघाला. त्यात पुन्हा राफेल, बेरोजगारी, महागाई हे मुद्दे बाजूला पडले. आता महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात राफेलच्या चाकाखाली ठेवलेलं लिंबू चर्चेत आलं आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजन करण्याची आपली प्रथा आहे. हे औचित्य साधून गेल्या शनिवारी - विजयादशमीला भारतीय वायुसेनेत बहुचर्चित राफेल विमान दाखल झालं. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सला जाऊन राफेलची पूजा केल्याचे फोटो प्रसिद्ध झालेत. त्यावेळी राफेलच्या चाकांखाली लिंबू ठेवल्याचं दिसतंय आणि तोच वादाचा विषय ठरला आहे. राफेल विमानासारखं आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेलं अस्त्र आणताना ही अंधश्रद्धा कशासाठी?, असा प्रश्न विचारला जातोय. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीची नेतेमंडळी त्यावरून भाजपाची खिल्ली उडवताहेत. सोशल मीडियावर जोक्सचा पूर आला आहे.
राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवणे लाजिरवाणे : अंनिसची कडाडून टीका
#PMCBank च्या ग्राहकांनी 2-2 लिंबू बँकेच्या प्रत्येक शाखेच्या मुख्य दरवाज्याला लावुन ठेवावा.. 2 लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकते तर तुमचे पैशे का नाही? 😂😂😂 pic.twitter.com/x98Uc3iXRa
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 9, 2019
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची ऐशी तैशी!
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 9, 2019
देशाच्या रक्षणासाठी #Rafale आणलंय अन् राफेलच्या यशस्वी उड्डाणासाठी लिंबांचा उतारा ठेवला जातोय. वशीकरण स्पेशालिस्ट, सर्व तांत्रिक-मांत्रिक भाजपच्या चमूमध्ये दाखल झाले आहेत. आता आपल्या देशाला कोणाचीच नजर लागणार नाही. #RafalePujaPoliticspic.twitter.com/SGhZs88pBJ
विरोधी पक्षाच्या 'सायबर आर्मी'ने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यावेळी लिंबू-मिरची लावणाऱ्यांना मोदी हसले होते.
Video: कारला लिंबू मिरची लावणाऱ्यांना मोदी काय म्हणाले होते?; पंतप्रधानांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
त्यानंतर, राफेल पूजनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर म्हणून भाजपाच्या समर्थकांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी केलेल्या जहाज पूजनाचे फोटो व्हायरल करायला सुरुवात केलीय. त्यामुळे आणखी काही दिवस हा विषय चर्चेत राहू शकतो किंवा तो तसा ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असावा. कारण, हिंदुत्व हा मोदी सरकारचा, भाजपाचा 'अजेंडा' आहे. राफेलची कुंकू लावून केलेली पूजा, त्यावर काढलेला 'ओम' हे हिंदुत्वाचं द्योतक असल्याने ते जनमानसात पोहोचावं, असं भाजपाला वाटतच असणार. त्यामुळे आता विरोधकांची खरी कसोटी असेल.
लोकसभा निवडणुकीवेळी झालेली चूक विरोधक पुन्हा करतात का, लिंबावरून सुरू असलेल्या चर्चेतच ते अडकून पडतात का, 'भाजपाने फिरवलेल्या' लिंबाने 'झपाटले' जातात का, त्यात किती वेळ घालवतात, यावर बरंच काही ठरू शकतं. या लिंबाचा उतारा म्हणून त्यांना यावेळी आधीपेक्षा वेगळी 'करणी' अर्थात कृती करणं, म्हणजेच काँग्रेसच्या तरुण नेत्याने म्हटल्याप्रमाणे मुद्द्यांना धरूनच प्रचार करणं फायद्याचं ठरेल. अन्यथा हे लिंबू तोंड आंबटही करू शकतं.