नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कार्यरत झाले असून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न नेते सोडत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी नागपुरात त्यांच्या मतदारसंघात सभा घेत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी उमेदवारांचा समाचार घेताना 100 कोल्हे एकत्र आले तरी सिंहाची शिकार करु शकत नाही अशा शब्दात विरोधकांचा समचार घेतलेला आहे.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या विरोधात लढण्यासाठी चांगले पैलवान उतरवा, नितीन गडकरी यांच्याविरोधात पळपुटा उमेदवार उभा केला, माझ्याविरोधात पळपुटा उमेदवार उभा केला. अशा पळपुटांना आमच्याविरोधात का उभं करता? असा सवाल करत 100 कोल्हे आले तरी सिंहाची शिकार करु शकणार नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांना टोला लगावला आहे.
तसेच राज्यातील शेतकऱ्यांना देशातील आजपर्यंतची सर्वांत मोठी कर्जमाफी भाजप-शिवसेना सरकारने दिली. त्या कर्जमाफीचे काम अजूनही सुरू आहे. दुष्काळ, अनुदान बोंडअळी अनुदान, ट्रॅक्टरचे अनुदान अशा शेतकरी हिताच्या अनेक योजना भाजप शिवसेना सरकारने ५ वर्षांत राबविल्या. ५ वर्षांत ५० हजार कोटींची विकासकामे केलीत. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण झालेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विशेष म्हणजे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात स्वत:च्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रथमच सभा घेतली. टिंबर मार्केट येथे ही सभा झाली. आघाडी शासनाच्या काळापेक्षा मागील पाच वर्षांत दुप्पट काम केले. याबाबतीत तर मी विरोधकांना आमोरेसामोरे येऊन चर्चेचे आव्हानच देतो. विधानसभा निवडणुकांसाठी आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरलो आहोत. परंतु या निवडणुकीत मजाच नाही. पाच वर्षांच्या मुलाला देखील निकाल काय येणार हे माहीत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हताश व निराश झाले आहेत. आता त्यांनी आमच्या विरोधात उमेदवारही दमदार उतरविले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोपांच्या फैरी सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.