महाराष्ट्रात भाजपा - शिवसेना महायुतीकडे बहुमताचा आकडा असला, तरी त्यांच्यात मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून एकमत होत नसल्यानं सत्तास्थापनेची कोंडी फुटता फुटत नाहीए. ९ तारखेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास विधानसभा विसर्जित होऊन राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यामुळे सगळेच पक्ष वेगाने हातपाय मारताना दिसत आहेत. शिवसेना सोबत न आल्यास स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये भेटीगाठी, फोनाफोनी सुरू असल्याचंही समजतंय. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आहे. सातत्याने विरोधी पक्षात बसण्याची भूमिका पवार मांडत असले, तरी सस्पेन्स कायम ठेवण्याचं कामही ते चोख बजावताहेत. आजच्या पत्रकार परिषदेतही, राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत बोलण्यासारखं काही नाही, असं म्हणतानाच ते बरंच काही बोलून गेले.
...अन् अखेर शिवसेना नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, चर्चेचे चक्र फिरले; उद्धव ठाकरेंना मानाचं पद?
शरद पवार म्हणतात, तुमच्याप्रमाणे मीदेखील त्यांची आतुरतेनं वाट पाहतोय
राज्यातील जनतेनं भाजपा-शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांची युती आजची नाही. २५ वर्षांपासून ते सोबत आहेत. त्यामुळे ते आज ना उद्या एकत्र येतील आणि सरकार स्थापन करतील याची आम्हाला खात्री वाटते, असं शरद पवार यांनी पुन्हा स्पष्ट केलं. आता अवघे काही तास उरले आहेत आणि भाजपा-शिवसेनेतील तिढा सुटताना दिसत नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, या प्रश्नावरही त्यांनी युतीच्या एकीचा आशावाद व्यक्त केला. त्यांचं जमेल असा विश्वास मला अगदी शेवटच्या तासापर्यंत आहे, असं त्यांनी नमूद केलं.
२५ वर्षं युतीत सडली म्हणाले, पण एकत्रच निवडणूक लढले; शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास काही दिवसांत पुन्हा निवडणुका होतील'
राज्याच्या सत्तास्थापनेत माझी कुठलीही भूमिका नाही, पुढचे तीन दिवस तर मी मुंबईतही नाही, असं शरद पवार म्हणाले खरं; पण निर्णय घ्यायचा झालाच, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रच घेतील, असंही त्यांनी सूचित केलं आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कुठलंही प्रपोजल आणलं नव्हतं, ते नेहमीच भेटतात आणि आमची भेट सकारात्मकच होते, राज्यसभेच्या विषयासंदर्भात ते आले होते, असंही त्यांनी सांगितलं.
भाजपा-शिवसेनेनं घटनात्मक पेच निर्माण होऊ देऊ नये, त्यांच्याकडे संख्या आहे, त्यांनी सरकार बनवावं. आमच्याकडे संख्या असती तर आम्हीच बनवलं असतं, वाट पाहिली नसती, असा सल्लाही त्यांनी दिला.