मुंबई: राज्यात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच अनेकांच्या प्रचारसभांनीही राज्यात जोर धरला आहे. मतदानाचा दिवस जसा-जसा जवळ येतोय, तसा प्रचाराचा जोर वाढत असून आरोपप्रत्यारोपांची फेरी झडत आहेत. या आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणूक विधानसभेची असली तरी पैलवान आणि कुस्तीचा आखाडा चांगलाच गाजताना दिसत आहे.
राज्यात कुस्ती हा महत्वाचा खेळ असून राज्यातील कुस्तीच्या संघटनेचा मी अध्यक्ष असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज पुन्हा टोला लगावला आहे. शरद पवार जळगावमधील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात बोलत होते.
आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर कोणीच विरोधक नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले. लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी फडणवीसांवर प्रतिहल्ला चढवला होता. त्यानंतर 'आम्ही नटरंग नाही, त्यामुळे तसे हातवारे करीत नाही. ते आम्हाला शोभत नाही. पवारांची मानसिकता ढासळली असल्याने असे हातवारे करीत आहेत,'असं प्रतिउत्तर देखील देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना दिलं होतं. तसेच ''खरा पैलवान कोण? हे जनता 24 ऑक्टोबरला दाखवून देईल. तसेच आम्ही काही नटरंग नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करत नाही. तसेच ते आम्हाला शोभतही नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे शरद पवार यांची मानसिकता ढासळी आहे. त्यामुळे ते हातवारे करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती.