मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. निवडणूक निकालांचे विविध चॅनेल्सवर आलेले एक्झिट पोलवरुन राज्यात पुन्हा एकदा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. महायुतीला २०० च्यावर जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र या वातावरणात ईव्हीएम मशीन टँपरींग होऊ शकते अशी जनभावना असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी व त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
तसेच कोणत्याही मतदान यंत्राबाबात शंका निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी सलग चारवेळा करण्यात यावी, आणि ५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशी मागणीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशीही काँग्रेसकडून ईव्हीएमबाबत विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तब्बल २२१ तक्रारी केल्या आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडले होते. अचलपूर - १, ऐरोली - १, अकोला पूर्व - १, अकोला पश्चिम -६, अकोट -३, आंबेगाव - १, अमरावती -४, अंधेरी पश्चिम -१, अणुशक्तीनगर - १, औरंगाबाद -१३, औसा - १, बाळापूर - ३, भोकर - ५, बोरिवली - १, बुलढाणा - २, भायखळा - १, चांदिवली - ३, चंद्रपूर - ४, चिखली - १, चिमूर -१, चोपडा -१, कुलाबा -१, धुळे शहर - १, दिंडोशी -३, गडचिरोली - १, घाटकोपर - २, गोरेगाव - २, कोल्हापूर उत्तर - ६, कोल्हापूर दक्षिण -२, कर्जत जामखेड - ३, जालना -४, हिंगणघाट -२, जामनेर -१, जोगेश्वरी पूर्व - २, कराड उत्तर - १, कसबा पेठ - २, करवीर -१, खामगाव -२, किणवट -१, कोपरी पाचपाखाडी -१, कुर्ला १ अशा प्रकारे राज्यभरात ईव्हीएमबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारी नोंदविल्या आहेत.