पुरंदर - मागील निवडणुकीत जनतेने ६३ आमदार दिले होते, यावेळी यंदा या जागा दुप्पट करण्यासाठी आलो आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद द्या, महाआघाडीची महाबिघाडी झाली आहे. नवा महाराष्ट्रासाठी मला सगळ्यांची सोबत हवी असं आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, आशीर्वाद द्यायचा असेल तर शिवसेनेला मतदान करा. पहिल्यांदा मी आमदार म्हणून निवडून जाणार आहे. विजय शिवतारेंकडून मला खूप शिकण्याची इच्छा आहे म्हणून त्यांना निवडून द्या. विजय शिवतारेंची गरज महाराष्ट्राला आहे. याठिकाणी दुष्काळामुळे लोकांच्या आत्महत्या होत आहे. पण तुम्ही कोणत्याही पक्षात असाल दुष्काळामुळे आत्महत्या करु नका. आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नका, शिवसेनेचा विचार आणा असं त्यांनी सांगितले.
तसेच १९९७ मध्ये पुरंदरमध्ये उपसा सिंचन योजना आणली होती. मात्र दुर्दैवाने सरकार बदललं २० वर्षे ही योजना रखडली. या योजनेसाठी सर्वपक्षीय शेतकरी संघटना मला भेटली मला निवेदन दिलं. त्या निवेदनाची कॉपी मी व्हॉट्सअप विजय शिवतारेंनी पाठविली, अवघ्या ४ दिवसांत हा प्रकल्प मार्गी लागला. येत्या ६ महिन्यात ही योजना पूर्ण होऊन तेथील जमीन सुपीक होईल. त्यामुळे मला नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी अशा माणसांची गरज आहे. कितीतरी गोष्टी महाराष्ट्रात करायच्या आहेत त्यासाठी आशीर्वाद द्या असं आवाहन आदित्य ठाकरेंनी यावेळी केलं.
दरम्यान, २०१४ मध्ये मी बोललो होतो विजय शिवतारेंकडे मोठी जबाबदारी येणार आहे, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मंत्रीपद दिलं. पुरंदरसाठी १० हजार कोटी रुपये विजय शिवतारेंनी आणलेत. मुख्यमंत्र्यांनी एवढा निधी त्यांच्या मतदारसंघात नेला नसेल, अर्थात मुख्यमंत्र्याकडे महाराष्ट्र असतो. सत्तेत असूनही शिवसेना शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आंदोलन केली, सरसकट कर्जमुक्ती केल्याशिवाय गप्प बसणार नाही, प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये द्यायचे आहेत. महाराष्ट्रातील ५० हजार किमी रस्ते मला सिमेंट कॉंक्रिटचे करायचे आहे. मुंबईतील ५०० शाळांना व्हर्चुअल क्लासरुमच्या माध्यमातून जोडलं आहे हेच मला महाराष्ट्रात करायचं आहे असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले.