Maharashtra Election 2019: बंडोबांना शांत करण्यात महायुतीला यश?; पाहा कुठे अन् कोणी घेतली माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:43 PM2019-10-07T16:43:22+5:302019-10-07T17:13:30+5:30
पनवेल विधानसभा मतदार संघात सेनेची बंडखोरी शमविण्यात यश आलं असून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार बबन पाटील यांची माघार घेत युतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंडोबांना शांत करण्यात शिवसेना-भाजपा महायुतीला काही प्रमाणात यश आल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. अनेक बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी कमी झाल्याचं दिसून येत आहे. तसेच यातही काही भागात राष्ट्रवादी-मनसे यांनी पडद्यामागून एकमेकांना सहकार्य केल्याची भूमिका घेतल्याचं दिसून आलं. नाशिकमध्ये राष्ट्रवादी उमेदवारासाठी मनसे उमेदवाराने माघार घेतली तर त्याची परतफेड म्हणून ठाण्यात मनसे उमेदवाराला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी उमेदवाराने माघार घेतली आहे.
शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून माघार घेतली आहे. भाजच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात त्यांनी अपक्ष अर्ज भरला होता. याठिकाणी शिवसेनेच्या तिघांपैकी 2 जणांची माघार आहे तर शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे नॉट रीचेबल असल्याने त्यांची बंडखोरी कायम असल्याचं दिसून आलं. ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक तथा प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या ठिकाणी निवडणूक न लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार, पक्षाने सुहास देसाई यांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या होत्या. सुहास देसाई यांनीही पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षादेशाचा सन्मान करीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, असे परांजपे आणि मुल्ला यांनी सांगितले.
औरंगाबाद मध्यमधून भाजपचे बंडखोर किशनचंद तनवाणी आणि एमआयएम बंडखोर जावेद कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या विरोधात शिवसेनेचा जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांची बंडखोरी कायम आहे तर राष्ट्रवादी उमेदवार रवींद्र पाटील यांनी माघार घेत शिवसेना उमेदवाराला समर्थन देण्याची खेळी खेळल्याचं बोललं जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चारही मतदार संघातून भाजप बंडखोरांची माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेना-आघाडीची थेट लढत होणार आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रणजीत भोसले यांची माघार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि भाजपमधून शिवसेनेत गेलेले महेश शिंदे यांच्यात होणार लढत होईल. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे बंडखोर सुधीर कोठारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार माजी आमदार अशोक शिंदे यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
पनवेल विधानसभा मतदार संघात सेनेची बंडखोरी शमविण्यात यश आलं असून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार बबन पाटील यांची माघार घेत युतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे साताऱ्यात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतून तसेच वाई विधानसभा निवडणूकीतून माघार घेऊन उदयनराजे व मदन भोसलेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेना बंडखोराची उमेदवारी कायम आहे, धनंजय बोडारे यांनी माघार न घेतल्याने त्यांची आता भाजपचे उमेदवार आ. गणपत गायकवाड यांच्या विरोधात लढत राहणार आहे. बेलापूर मतदारसंघातून शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांची बंडखोरी कायम ठेवली असून शिवसैनिकांच्या आग्रहाखातर निवडणूक लढण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य अँड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केली. तर भाजपाचे सरचिटनीस डॉ. अतुल भोसले यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे कराड दक्षिणमध्ये काँग्रेस, भाजपा आणि उंडाळकर गटात चुरशीची तिरंगी लढत होणार आहे.