महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा 'गेम'?; आता मातोश्रीवर येणार पाठिंबा देण्याची वेळ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 08:34 PM2019-11-11T20:34:40+5:302019-11-11T20:38:07+5:30
शिवसेनेला मुदत वाढवून देण्यास राज्यपालांचा नकार
मुंबई : भाजपाने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला 24 तासांची मुदत दिली होती. ही मुदत अपुरी असल्याने शिवसेनेने वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी त्यांची मागणी फेटाळून लावली. शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीनं दिवसभर मॅरेथॉन बैठकी घेतल्या. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दलचं कोणतंही पत्र दोन्ही पक्षांकडून देण्यात आलं नाही. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
आज संध्याकाळी शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यामध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचादेखील समावेश होता. आम्हाला राज्यपालांनी केवळ २४ तासांची वेळ दिली होती. त्यात आम्हाला दोन पक्षांची चर्चा करायची होती, असं आदित्य यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. आम्हाला 7.30 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती वेळ वाढवून देण्याची मागणी आम्ही केली. मात्र राज्यपालांनी वेळ नाकारली आहे. वेळ नाकारली तरीही दावा नाकारलेला नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
काँग्रेस राष्ट्रवादीनं शिवसेनेकडे पाठिंब्याचं पत्र दिल्याचं वृत्त असताना शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सोनिया गांधी यांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्याची मागणी करण्याचा सल्ला दिला होता. याबाबतचा संदेश त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिला होता. त्याप्रमाणे शिवसेनेनं राज्यपालांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपालांनी ही मागणी फेटाळली आहे.
राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिल्यानं शिवसेनेच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नाला मोठा हादरा बसला आहे. भाजपानं बहुमत सिद्ध करावं. अन्यथा आमच्याकडे १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा केला होता. मात्र हा दावा पोकळ असल्याचं आज पाहायला मिळालं. याशिवाय शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळातून अवजड उद्योग मंत्रिपदाचादेखील राजीनामा दिला.