मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभा रस्त्यावर घेण्याची परवानगी मनसेनंनिवडणूक आयोगाकडे मागितली आहे. पाऊस लांबल्यानं मैदानांमध्ये सभा घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर सभा घेण्यास परवानगी द्या अशी मागणी करणारं पत्र मनसेनं राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लिहिलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील मैदानं आरक्षित करण्यात आली आहेत. मात्र पावसामुळे मैदानांमध्ये पाणी साचत असल्यानं मनसेसह सर्वच राजकीय पक्षांच्या सभा रद्द कराव्या लागत आहेत. पावसामुळे मैदानात चिखल होतो आणि पाऊस थांबला तरी चिखलामुळे सभा घेणं शक्य होत नाही, असं मनसेनं निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज ठाकरेंची काल पुण्यातील कसबा पेठेत सभा होती. मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्यानं ही सभा रद्द करावी लागली, याचा उल्लेखदेखील पत्रात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार परतीचा पाऊस २०-२१ ऑक्टोबरपर्यंत लांबू शकतो. असं झाल्यास आमचे उमेदवार प्रचारापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रचार सभांसाठी रस्ते उपलब्ध करुन द्यावेत, असी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
Maharashtra Election 2019: रस्त्यावर सभा घ्यायला परवानगी द्या; मनसेची निवडणूक आयोगाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 2:18 PM