मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरेंनी काल भिवंडी, कल्याणमध्ये प्रचारसभा घेत भाजपा, शिवसेना सरकारला लक्ष्य केलं. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी या प्रश्नांवरुन त्यांनी सरकारवर तोफ डागली. तुम्ही शांत राहता. तुम्हाला चीडच येत नाही. त्यामुळेच सत्ताधारी तुम्हाला गृहीत धरतात. त्यामुळे तुमचा संताप मतपेटीतून व्यक्त करा, असं आवाहन राज यांनी उपस्थितांना केला.मला अन्याय सहन करून थंड बसणाऱ्या माणसांचं नेतृत्व करायला आवडत नाही. त्यामुळे अन्यायाविरुद्ध पेटून उठा, असं राज ठाकरे प्रचारसभेतील भाषणात म्हणाले. यावेळी राज यांनी राज्यातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवर भाष्य करताना मेक्सिकोत नुकत्याच झालेल्या एका घटनेचा संदर्भ दिला. मेक्सिकोत रस्ते दुरुस्तीचं आश्वासन न पाळणाऱ्या एका महापौराला स्थानिकांनी गाडीला बांधून फरफटत नेलं, असं राज यांनी सांगितलं. नेमकं काय घडलं होतं मेक्सिकोत?गेल्या आठवड्यात मेक्सिकोच्या महापौरांना स्थानिकांनी गाडीला बांधून फरफटवलं. या प्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना अटक केली. रस्ते खराब असल्यानं ग्रामस्थांनी महापौरांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढून एका पिकअप ट्रकला बांधलं आणि रस्त्यावरुन फरफटत नेलं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत महापौराची सुटका केली.
महापौर जॉर्ज लुईस इस्कॅन्डॉन हेर्नानडेझ यांनी ग्रामस्थांना रस्ते दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र वारंवार वचनाची आठवण करुन देऊनही त्यांनी रस्ते दुरुस्त केले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी हेर्नानडेझ यांना कार्यालयातून बाहेर काढलं. यानंतर त्यांना पिकअप ट्रकला बांधून फरफटवण्यात आलं. या घटनेनंतर परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. याआधीही आश्वासनं पूर्ण न केल्यानं हेर्नानडेझ यांच्यावर स्थानिकांनी हल्ला केला होता.
हेर्नानडेझ यांच्यावरील हल्ल्याची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामध्ये काही जण त्यांना इमारतीमधून बाहेर खेचून आणून गाडीला बांधताना दिसत होते. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला. त्यामध्ये गाडीच्या मागे फरफटत जाणारे हेर्नानडेझ दिसत होते. या प्रकरणी आपण अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं हेर्नानडेझ यांनी सांगितलं.