नाशिक: भाजपासोबतच्या युतीत शिवसेना सडली असं म्हणून पुन्हा त्याच भाजपाशी युती करणाऱ्या शिवसेनेचा मनसेप्रमुख राज ठाकरेंनी नाशिकमधील सभेत समाचार घेतला. भाजपाच्या मागे आणखी किती घरंगळत जाणार? अरे, माणसं आहात की गोट्या?, असे प्रश्न उपस्थित करत राज यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. ते नाशिकमधील सभेत बोलत होते.राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची नक्कलदेखील केली. 'त्यांची (उद्धव ठाकरेंचं) त्यावेळच्या भाषणाची क्लिप आठवतेय का? त्यांचं भाषण आठवण्यासारखं नव्हतं. पण घोषणा आठवण्यासारखी होती. आज.. यापुढे.. महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा.. आमची इतकी वर्ष युतीत सडली.. मोठा अभिमान.. मोठा स्वाभिमान.. पण भाजपानं त्यांना नाशकात एक सीट दिली नाही.. मग इथल्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? पुण्यात पण एकदेखील जागा दिली नाही.. नुसते चालले आपले त्यांच्या मागे घरंगळत,' अशा शब्दांत राज यांनी उद्धव यांना लक्ष्य केलं. भाजपाच्या मागे आणखी किती घरंगळत जाणार? अरे, माणसं आहात की गोट्या?, असे प्रश्न राज यांनी विचारले.शिवसेना आणि भाजपाच्या जाहीरनाम्यावर यावेळी राज यांनी तोफ डागली. 'सध्या शिवसेना, भाजपावाले राज्यभर ताटवाट्या घेऊन फिरताहेत.. १० रुपयांत जेवण.. ५ रुपयांत जेवण.. जणू काय महाराष्ट्र भिकेलाच लागलाय..,' असं म्हणत राज यांनी शिवसेना, भाजपाला लक्ष्य केलं. काश्मीरमधील कलम ३७० वर बोलण्यापेक्षा मुद्द्यांवर बोला, असं आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं. तरुणांच्या जाणाऱ्या नोकऱ्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोला, असंदेखील ते पुढे म्हणाले.
Maharashtra Election 2019: 'भाजपाच्या मागे किती घरंगळत जाणार? माणसं आहात की गोट्या?'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 9:13 PM