मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतरमनसे अध्यक्ष राज ठाकरे फारसे चर्चेत नाहीत. मात्र त्यांचं एक व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज ठाकरेंनी व्यंगचित्र प्रसिद्ध केलेलं नाही. मात्र वर्षभरापूर्वी राज यांनी काढलेलं चित्र सध्याच्या परिस्थितीवर नेमकं भाष्य करणारं असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केली आहे. राज यांचं भाकीत अतिशय अचूक ठरल्याचं नेटकरी म्हणत आहेत. त्यामुळे वर्षभरापूर्वी त्यांनी काढलेलं चित्र अचानक चर्चेत आलं आहे.वर्षभरापूर्वी यवतमाळच्या पांढरकडा भागात अवनी नावाच्या वाघिणीनं दहशत निर्माण केली होती. त्यावेळी भाजपा-शिवसेनेनं वाघिणीला मारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज यांनी एक व्यंगचित्र काढलं होतं. त्यात त्यांनी विधानसभेत जनताच तुमचा माज उतरवेल, असं भाकीत वर्तवलं होतं. मात्र जनतेनं पुन्हा एकदा महायुतीला कौल दिला. असं असलं तरी भाजपा, शिवसेनेनं स्वत:च राज यांचं भाकीत खरं ठरवलं. सत्तापदांच्या वाटपावरुन युतीची शिकार झाल्यानं राज यांनी वर्तवलेलं भाकीत सत्यात उतरलं, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्र निवडणूक 2019: राज ठाकरेंचं 'ते' कार्टून आणि आज झालेली युती सरकारची 'शिकार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 16:41 IST