मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणतं राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. त्यानंतर लाव रे तो व्हिडिओची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत लोकसभासारखा लाव रे व्हिडिओ सारख्या सभा नसल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. परंतु आता विधानसभेच्या काही प्रचारसभेत लाव रे तो व्हिडिओ दिसण्याचे संकेत खुद्द राज ठाकरे यांनी मराठी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत दिले आहे.
राज ठाकरेंना मुलाखतीत लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत सध्या तुम्ही प्रचार करताना दिसत नाही असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर माझ्या विधानसभेच्या काही सभा बाकी आहेत. पंतप्रधान मोदी खूप काही बोलेले होते. तसचं भाजपा आणि शिवसेनेने देखील गेल्या 5 वर्षात बरचं काही बोलले आहेत. त्यामुळे माझ्या पुढील सभांमध्ये कदाचित तुम्हाला काहीतरी नक्की मिळेल असं म्हणत राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ पार्ट 2चे संकेत दिले आहे.
राज्याला एक सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, सत्तेतला आमदार काही करु शकत नाही, विरोधी पक्षाचा आमदार प्रबळ असायला हवा. सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व समस्यांवर आवाज उठवणाऱ्या सक्षम, प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे. मी सत्तेसाठी नाही तर प्रबळ विरोधी पक्षासाठी मी आलो आहे. तुमचा राग व्यक्त करण्यासाठी माणसं नसतील तर उपयोग नाही अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भूमिका मांडत विरोधी पक्षासाठी संधी द्या असं आवाहन प्रत्येक सभेत करण्यात येत आहे.