मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराला वेग आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी ९ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत स्मृती इराणी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र नोंदी यांची राज्यातील पहिली प्रचार सभा १३ ऑक्टोबर रोजी जळगाव येथे होणार आहे. याच दिवशी पंतप्रधानांची साकोली ( जि. भंडारा ) येथेही सभा होणार आहे. १६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अकोला, ऐरोली (नवी मुंबई) आणि परतूर, येथे तर १७ ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, परळी येथे सभा होणार आहेत. १८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील सभेने पंतप्रधान मोदी यांच्या प्रचार दौऱ्याची सांगता होणार आहे.
स्मृती इराणी यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. स्मृती इराणी यांनी सांगितले की, काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी साडे सात हजार कोटी एवढी नुकसान भरपाई मिळाली. फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना २१ हजार ९५० कोटी एवढी भरपाई पीक विम्यापोटी मिळाली. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना २५ हजार कोटींची कर्जमाफी दिली. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात दीड लाख कोटी एवढी गुंतवणूक करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत एकही दंगल झाली नाही, एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. फडणवीस सरकारच्या काळात जनतेने सुखी, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र अनुभवला, असेही स्मृती इराणी यांनी नमूद केले.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील निवडणूक लढवित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातारा, तसेच नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या प्रचारासाठीही येणार आहेत. त्यामुळे मोदींच्या सभेमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.