नवी दिल्ली/मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपाचे मातब्बर नेते नितीन गडकरी यांना आव्हान देणारे काँग्रेस नेते नाना पटोले विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसनेनाना पटोले यांना भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. नाना पटोले हे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत साकोली मतदारसंघातून निवडून आले होते. 2014 मध्ये नाना पटोल यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपाचे राजेश काशिवार विजयी झाले होते. आता नाना पटोले यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्याने येथे काँग्रेसचे पारडे जड झाले आहे.
दरम्यान, सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी रात्री पक्षाने चौथी यादी जाहीर केली. यात नागपूर शहर व जिल्ह्यातील तीन जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले. रामटेकमधून कॉग्रेसने उदयसिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे तर कामठी मतदारसंघातून माजी आमदार सुरेश भोयर यांना तिकीट दिले आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना उमेदवारी मिळालेली नाही. दुसरीकडे भाजपनेदेखील सायंकाळी आणखी एक यादी जाहीर केली. यात रामटेकहून विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनाच संधी देण्यात आली आहे. काटोल व कामठी विधानसभा क्षेत्रातील उमेदवार रात्रीपर्यंत जाहीर करण्यात आले नव्हते.