मुंबई : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सत्तास्थापनेचे प्रयत्न करू असे आश्वासन दिल्याचे भाजपाचे राज्यसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
तसेच राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजपाला मदत करणे माझे कर्तव्य आहे. सत्तास्थापनेसाठी जे करावे लागेल ते करेन, आम्ही प्रयत्न करू, असेही राणे म्हणाले. याचबरोबर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाईल असे मला वाटत नाही, असेही राणे यांनी सांगितले.
शिवसेनेने शेतकऱ्यांना आश्वासने दिली आहेत. शेतीही पाहून आले आहेत. पण त्यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आले आहे, असे मला वाटते. भाजपा राज्यपालांकडे जाईल तेव्हा 145 आमदारांची यादी असेल रिकाम्या हाताने जाणार नाही, असा टोला राणे यांनी शिवसेनेला लगावला.
शिवसेना नैतिकतेला धरून वागली नाही. महायुतीमध्ये बहुमत मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होतात पण निर्णय होत नाही. ते शिवसेनेला उल्लू बनवत आहेत. काँग्रेसचे नेते एकीकडे बोलतात आणि दुसरीकडे कसे वागतात हे शिवसेनेला कळायला हवे. युती म्हणजे वचन असते ते शिवसेनेने पाळले नाही, असा आरोपही राणे यांनी केला.