मुंबईः महाराष्ट्रातल्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. भाजपा 122वरून घसरून 102 जागांवर आली आहे. तर शिवसेनासुद्धा 57च्या जवळपास जागा जिंकण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपाचं एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण पुन्हा एकदा सुरू झाल्याचं चित्र आहे. दोघांनीही जनतेचा कौल स्वीकारला असल्याचे सूतोवाच केले. त्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या विजयाबद्दल जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.ट्विट करत ते म्हणाले, एनडीएला जनतेनं दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल मी आभारी आहे. जनतेनं पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी आभारी आहे. आम्ही महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहू, प्रत्येक कार्यकर्ता मग तो भाजपाचा असो, शिवसेनेचा असो किंवा एनडीएचा असो, त्यांनी केलेल्या कामासाठी मी त्यांना सलाम करतो. विधानसभा निवडणुकीचा कल हाती आल्यानंतर शिवसेनेनेही मिळालेल्या संधीचा फायदा घेत भाजपाला सूचक इशारे दिले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरलेल्या 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करून देत शिवसेना पक्षप्रमुखांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं जे ठरलं आहे, त्यानुसार होईल, असे उत्तर दिले.
महाराष्ट्र निवडणूक 2019 : नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या 'अनपेक्षित' निकालावर मोजकंच बोलले; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 7:26 PM