मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातल्या सभेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. भर पावसात सभा घेत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पायाला दुखापत होऊनही पवारांनी दाखवलेल्या जिद्दीचं सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे. काल रात्रीपासून पवार ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहेत. आजदेखील ट्विटरवर तोच ट्रेंड कायम आहे. मात्र पवारांच्या सभेपूर्वी त्यांच्या डोक्यावर छत्री धरण्यात आली होती. काल शरद पवार साताऱ्यातल्या सभेत राष्ट्रवादी सोडून भाजपाता गेलेल्या उदयनराजे भोसले यांच्यावर बरसले. पावसाची संततधार सुरू असूनही शरद पवार थांबले नाहीत. पवारांची सभा सुरू होण्याच्या आधीच सभास्थळी पाऊस सुरू होता. त्यामुळे व्यासपीठावर येताना पवारांच्या डोक्यावर छत्री धरण्यात आली होती. मात्र उपस्थितांना संबोधित करताना पवारांच्या डोक्यावर छत्री धरण्यात आली नव्हती. पाऊस सुरू असताना शरद पवार भाषण करण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी समोर असलेले कार्यकर्ते भिजत होते. त्यामुळे पवारांनीदेखील पावसात भिजत भाषण करण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम अवघ्या काही मिनिटांमध्ये पाहायला मिळाला. ७८ वर्षांचे शरद पवार भर पावसात आणि पायाला दुखापत होऊनही सभा घेत असल्याचं पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. पवारांच्या भाषणावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाच्या हातात छत्री असल्याचं दिसत होतं. त्यानं एक दोनवेळा ती उघडण्याचाही प्रयत्न केला. पण पुढे काय झालं, त्यानं ती छत्री का उघडली नाही, हे समजू शकलं नाही. शरद पवारांनी त्यांच्या भाषणात उदयनराजेंचा समाचार घेतला. आम्ही लोकांनी साताऱ्यातील निवडणुकीत चूक केली होती. आम्हाला ती चूक दुरूस्त करायची आहे. साताऱ्यातील चूक दुरूस्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तरुण घराघरात वाट पाहात आहे. 21 तारखेला हा तरुणवर्ग निर्णय घेईल, असं म्हणत शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना लक्ष्य केलं. एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, निवडणुकीत विरोधकच नाहीत. आम्हाला दुसऱ्या बाजूला पैलवान दिसतच नाहीत. या तालुक्यात अनेक पैलवान आमच्या नेत्यांनी तयार केले आहेत. पैलवान आणि कुस्ती हे शब्द भाजपला शोभत नाहीत. येत्या 21 तारखेचा निकाल हा सातारा जिल्हा शब्दाचा किती पक्का आहे, हे सांगेल. हा जिल्हा खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा असल्याचं पवारांनी सांगितलं.