मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन जवळपास दोन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना शिवसेना आणि भाजपानं सत्ता स्थापन करावी. जनतेनं त्यांना कौल दिला आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी 'युतीत शिवसेनेची 25 वर्षे सडली' म्हणणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.शिवसेना आणि भाजपामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष पेटला आहे. याबद्दल बोलताना पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. युतीमध्ये आमची 25 वर्ष सडली असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र तरीही त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि एकत्र निवडणूक लढवली, असा टोला शरद पवार यांनी लगावला. भाजपा, शिवसेनेमध्ये संवादच होत असल्यानं राज्यात सत्तेचा तिढा कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावर आम्हाला जनतेनं विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे. राज्य चालवण्याची जबाबदारी मतदारांनी शिवसेना, भाजपाकडे सोपवली आहे. त्यामुळे ते लवकरच सत्ता स्थापन करतील, अशी अपेक्षा आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्षाचं कर्तव्य पार पाडू, असं उत्तर पवार यांनी दिलं. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करेल आणि काँग्रेस बाहेरुन पाठिंबा देईल, अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावर आम्ही आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढलो आहोत. त्यामुळे निर्णय घ्यायचा झालाच, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र घेईल, असं म्हणत शरद पवारांनी 'सस्पेन्स' कायम ठेवला.
महाराष्ट्र निवडणूक 2019: २५ वर्षं युतीत सडली म्हणाले, पण एकत्रच निवडणूक लढले; शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 1:07 PM