मुंबई: निवडणूक निकालाला दोन आठवडे होत आले तरी राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपावरून संघर्ष सुरू असल्यानं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापन झालेलं नाही. शिवसेनेकडून दबावाचं राजकारण सुरू असताना भाजपा काहीशी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपा अध्यक्ष अमित शहा निकालानंतर महाराष्ट्रात न आल्यानं उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यावर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल भाष्य केलं. राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केलं. त्यावेळी पत्रकारांनी पवारांना अमित शहांच्या अनुपस्थितीविषयी प्रश्न विचारला. बहुमत नसतानाही अमित शाहांनी मागच्या काळात काही राज्यांमध्ये भाजपाची सरकारं स्थापन केली आहेत. मग महाराष्ट्रात ते लक्ष घालत नाहीत, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांच्या त्याच सत्ता स्थापनेच्या कौशल्याची तुमच्याप्रमाणे आम्हीही आतुरतेनं वाट पाहतोय. त्यांनी सरकार स्थापन करावं, असं उत्तर पवार यांनी दिलं.भाजपा, शिवसेनेमध्ये संवादच होत असल्यानं राज्यात सत्तेचा तिढा कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावर आम्हाला जनतेनं विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे. राज्य चालवण्याची जबाबदारी मतदारांनी शिवसेना, भाजपाकडे सोपवली आहे. त्यामुळे ते लवकरच सत्ता स्थापन करतील, अशी अपेक्षा आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्षाचं कर्तव्य पार पाडू, असं उत्तर पवार यांनी दिलं. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करेल आणि काँग्रेस बाहेरुन पाठिंबा देईल, अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावर आम्ही आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढलो आहोत. त्यामुळे निर्णय घ्यायचा झालाच, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र घेईल, असं म्हणत शरद पवारांनी 'सस्पेन्स' कायम ठेवला.
महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार म्हणतात, तुमच्याप्रमाणे मीदेखील त्यांची आतुरतेनं वाट पाहतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 1:40 PM