मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची समन्वय बैठक अचानक रद्द झाल्यानं खळबळ उडाली आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या बैठकीतून तडकाफडकी निघाले. यावेळी त्यांनी काँग्रेससोबतची बैठक रद्द झाल्याचं सांगितलं. यामुळे दोन्ही पक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असतानाही समन्वय समितीची बैठक तडकाफडकी रद्द का करण्यात आली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार तडकाफडकी निघाले. ते गाडीच्या दिशेनं जात असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र नो कमेंट्स म्हणत अजित पवार गाडीत बसले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यामुळे शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवारांचं काही बिनसलं का, असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र अजित पवार नाराज नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. बारामतीला जातो असं ते चेष्टेनं म्हणाले असावेत, असंदेखील पवारांनी सांगितलं.आज संध्याकाळी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार होती. मात्र अजित पवार राष्ट्रवादीच्या बैठकीतून तडकाफडकी निघाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्यासोबत गाडीत होते. काँग्रेससोबतची बैठक रद्द झाल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यावर काँग्रेससोबत पुन्हा बैठक कधी होणार, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारला. या प्रश्नाला माहीत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. मी बारामतीला जात असल्याचं सांगत अजित पवार बैठक स्थळाहून निघून गेले.राष्ट्रवादीच्या बैठकीला अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीतून अजित पवार तडकाफडकी निघून गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत जयंत पाटीलदेखील होते. पवार आणि पाटील बैठक स्थळावरुन निघाल्यानंतर तटकरेदेखील बाहेर पडले. मात्र मी बैठकीला उशिरा पोहोचल्यानं अजित पवार अचानक का निघून गेले, याबद्दल मला कल्पना नसल्याचं तटकरे म्हणाले. पुढील आठवड्यापासून लोकसभेचं अधिवेशन होणार आहेत. त्यात राज्यात लागू असलेल्या राष्ट्रपती राजवटीवर चर्चा अपेक्षित आहे. त्याच पार्श्वभूमीवर मार्गदर्शन घेण्यासाठी मी शरद पवारांना भेटायला आलो होतो, असं तटकरेंनी सांगितलं.