मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात असून आजचा अखरेचा दिसव आहे. त्यामुळे सत्ताधारी-विरोधातील पक्षाच्या नेत्यांनी सभांचा धडाकाचं लावला आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी पर्वती विधानसभा मतदारसंघात आपल्या सभेतून सत्तधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांना प्रचार सुद्धा करू न देण्याची भाजपची नीती असेल, तर ही ही अघोषित आणीबाणी नाही का ? असा प्रश्न कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केला.
अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. त्यांनी महाराष्ट्रभरात प्रचारसभांचा धडका लावला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोल्हे यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास मनाई करण्यात आले होते. त्यामुळे कोल्हे यांच्या गुरुवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात होणाऱ्या तीन सभा रद्द करण्यात आल्या होत्या. त्याच बरोबर धनंजय मुंडे यांच्या सुद्धा यामुळेच सभा रद्द करण्यात आल्या होत्या.
तर याच मुद्द्यावरून कोल्हे यांनी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी हे एका राजकीय पक्षाच्या प्रचाराला आले होते. त्यामुळे त्यांनी सर्वसमान्य सारखे यायला पाहिजे होते. मात्र त्यांनी तसे न करता इतरांच्या राजकीय प्रचाराचा खेळखंडोबा केला. विरोधापक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जर प्रचार सुद्धा करू दिला जात नसेल, तर ही अघोषित आणीबाणी नाही का ? असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला.
पुढे बोलताना कोल्हे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीत गेल्या पाच वर्षात काय केलं यावर बोलत नाही. मात्र कलम ३७० रद्द झाले यावर बोलताना पहायला मिळत आहे. तर याच मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा केला. मात्र प्रत्यक्षात यावर्षी ३५१ तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जलयुक्त शिवार योजनेत नक्की पाणीचं मुरवायचे होते का ? असा प्रश्न उपस्थित करत, कोल्हेंनी फडणवीस यांना टोला लगावला.