Maharashtra Election 2019: शरद पवारांच्या भर पावसातील सभेवर सुप्रिया सुळे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 04:57 PM2019-10-19T16:57:33+5:302019-10-19T16:58:09+5:30
Maharashtra Election 2019 पवारांच्या सभेचं सोशल मीडियाकडून जोरदार कौतुक
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातल्या सभेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. भर पावसात सभा घेत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पायाला दुखापत होऊनही पवारांनी दाखवलेल्या जिद्दीचं सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे. काल रात्रीपासून पवार ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहेत. पावसाची संततधार सुरू असूनही पवारांनी केलेल्या भाषणांचं अनेकांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे.
पवारांच्या पावसातल्या भाषणाची राष्ट्रीय माध्यमांनीदेखील दखल घेतली. #SharadPawar रात्रीपासून ट्विटरवर ट्रेंडमध्ये पाहायला मिळाला. विशेष म्हणजे बराच वेळ हा हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर होता. पवारांच्या या आक्रमक भाषणाची त्यांची कन्या सुप्रिया सुळेंनी प्रशंसा केली आहे. 'साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय पवार साहेबांना ऐकत होतं. 'वारं फिरलंय, इतिहास घडणार', हा संदेश देणाऱ्या या सभेनं राष्ट्रवादीच्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली,' असं सुप्रियांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय @PawarSpeaks साहेबांना ऐकत होतं. 'वारं फिरलंय,इतिहास घडणार', हा संदेश देणाऱ्या या सभेनं @NCPspeaks च्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली. pic.twitter.com/yMF7kPd5qK
— Supriya Sule (@supriya_sule) October 18, 2019
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीदेखील पवारांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. 'मी म्हटलं होतं, 'हवा बदलतेय'! याची प्रचिती आता सर्वांनाच आली. कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्येही आदरणीय पवार साहेबांनी सातारकरांना संबोधित केलं. उसळलेल्या अलोट जनसागरानं तितक्याच आत्मीयतेनं साहेबांच्या हाकेला प्रतिसाद दिला. असलं ऊर्जावान नेतृत्व आम्हाला लाभलं, हे आमचं भाग्यच!', अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी पवारांच्या भाषणाचं कौतुक केलं आहे.
मी म्हटलं होतं, 'हवा बदलतेय'! याची प्रचिती आता सर्वांनाच आली. कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्येही आदरणीय @PawarSpeaks साहेबांनी सातारकरांना संबोधित केलं.उसळलेल्या अलोट जनसागरानं तितक्याच आत्मीयतेनं साहेबांच्या हाकेला प्रतिसाद दिला.असलं ऊर्जावान नेतृत्व आम्हाला लाभलं, हे आमचं भाग्यच! pic.twitter.com/lfSBibgTTP
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 19, 2019
शरद पवारांनी त्यांच्या कालच्या भाषणात उदयनराजेंचा समाचार घेतला. आम्ही लोकांनी साताऱ्यातील निवडणुकीत चूक केली होती. आम्हाला ती चूक दुरूस्त करायची आहे. साताऱ्यातील चूक दुरूस्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तरुण घराघरात वाट पाहात आहे. 21 तारखेला हा तरुणवर्ग निर्णय घेईल, असं म्हणत शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना लक्ष्य केलं.
एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, निवडणुकीत विरोधकच नाहीत. आम्हाला दुसऱ्या बाजूला पैलवान दिसतच नाहीत. या तालुक्यात अनेक पैलवान आमच्या नेत्यांनी तयार केले आहेत. पैलवान आणि कुस्ती हे शब्द भाजपला शोभत नाहीत. येत्या 21 तारखेचा निकाल हा सातारा जिल्हा शब्दाचा किती पक्का आहे, हे सांगेल. हा जिल्हा खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा असल्याचं पवारांनी सांगितलं.