मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. या दौऱ्यात मला एक चित्र दिसतंय की लोकांना परिवर्तन हवं आहे. लोकं भाजपा आणि शिवसेनेवर नाराज असल्याचे दिसून येत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकोल्याच्या प्रचारसभेत केलं आहे.
देशात याआधी कधीच सैन्याच्या कामगिरीचा वापर मतांसाठी केला नाही. ज्या ज्या वेळी पाकिस्तान आणि भारतात युद्ध झाले, तेव्हा प्रत्येक वेळी सैन्याने पाकिस्तानला चोख धडा शिकवला असल्याचे त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भूगोल बदलत पाकिस्तानचे विभाजन केले. मात्र त्यांनी सैन्याच्या शौर्याचे श्रेय निवडणुकीत स्वतः घेतले नाही, ते काम मोदींनी केले. तसेच एका ठिकाणी पंतप्रधान म्हणाले की घुसके मारूंगा.. अहो लढणार सैन्य, यांचा काय संबंध ? लोकांना वाटलं यांनीच कामगिरी केली आणि लोकसभेत यांना मत दिलं होतं मात्र आता कशाच्या आधारे निवडणूक लढवणार असा प्रश्न देखील शरद पवारांनी उपस्थित केला.
राज्यात कांद्याचे भाव वाढले असता लोकसभेत विरोधकांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून माझा विरोध केला होता. त्यावेळी कांद्याच्या माळा घाला नाहीतर कवड्याच्या माळा घाला, मी शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे मी ठणकावून सांगितले होते. मात्र आजचे राज्यकर्ते तसं करताना दिसत नसल्याचे देखील शरद पवारांनी यावेळी सभेत बोलताना केले आहे.