मुंबई/पुणे/कोल्हापूर/औरंगाबाद : परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे भात, द्राक्षे, सोयाबीन या पिकांना फटका बसला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून पुढील चार दिवस राज्यात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे़
गेल्या तीन दिवसांपासून पडणाºया मुसळधार पावसाने रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कापलेली भातशेती पावसामध्ये भिजत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून भात, नागली पिके जमिनीवर झोपली आहेत. ‘भोगावती’चे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात दोन फुटांची वाढ झाली.
सांगली आणि सातारा जिल्ह्याला शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर रविवारीही बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. सोलापूर व पुणे जिल्ह्यातही संततधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले.
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात सोमवारी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी पूर्ण झाली असतानाच, दुसरीकडे या दिवशी मुंबई, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, रविवारी सलग तिसºया दिवशीही मुंबईवरील मळभ कायम होती. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, तर मराठवाड्याच्या काही भागांत लक्षणीय घट झाली. विदर्भाच्या उर्वरित भागांत किंचित घट झाली आहे.
तीन दिवस पावसाचे
२१ व २२ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २३ व २४ ऑक्टोबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़
२१ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात गडगडाट व जोरदार वाºयासह पावसाची शक्यता आहे़ पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, चार जिल्ह्णात २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान जोरदार वाºयासह विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात २१ ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे़
सोयाबीनला फटका
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर,बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे़ नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे मोठे नुकसान केले आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. विदर्भात हलक्या सरी कोसळत होत्या.
राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.