नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच निवडणुकीपूर्वी राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी पक्षाला रामराम करत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावरुन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खंत व्यक्त केली आहे.
माध्यमाशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आयारामांमुळे भाजपाचं कल्चर बदलेल अन्यथा त्यांचे कल्चर बदलेल, शेवटी काळाच्या ओघात पक्ष विस्तार करण्यासाठी माणसं जोडावी लागतात. नागपूरमध्ये जेवढे पदाधिकारी आहेत त्यातील ९० टक्के काँग्रेसचे आहेत. काँग्रेस मोठा पक्ष होता. त्यातून ते पक्षात आले त्यांनी पक्षाची संस्कृती स्वीकारली असं म्हणत गडकरींनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर भाष्य केलं आहे.
तसेच यंदाच्या निवडणुकीत भाजपाला अनुकुलता आहे, शिवसेनेसोबतची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. पक्ष मोठा झाला की सगळेच जण प्रवेश करतात. आशिष देशमुख जसं मॉर्निंग वॉक करतात तसं पक्ष बदलत असतात. देवेंद्र फडणवीस सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला.
दरम्यान, मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला जितक्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्या जागा टिकविणं हे आव्हान विरोधी पक्षांसमोर आहे, मात्र शिवसेना-भाजपा महायुती चांगल्या घेत पुन्हा निवडून येणार आहे. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं.
नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारे विधान केलं असं नाही, तर यापूर्वीही अनेकदा नितीन गडकरींनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना टोला लगावला होता. राज्यातील काही नेते असे असतात जे सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे अनेकदा ही मंडळी सत्ताधारी पक्षात प्रवेश करत असतात. त्यामुळे अशा नेत्यांना लोकांनी धडा शिकविला पाहिजे असं मत गडकरींनी यापूर्वी व्यक्त केलं होतं. नितीन गडकरी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मातब्बर नेते विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, वैभव पिचड, चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर अशा नेत्यांनी भाजपात प्रवेश केला