मुंबई: दिवसभर मॅरेथॉन बैठका घेऊनही काँग्रेस, राष्ट्रवादीनं शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे एनडीएनतून बाहेर पडलेली शिवसेना अद्याप वेटिंगवरच आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादीकडून आज निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं आता आमच्याकडे भरपूर वेळ असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला ‘वेटिंग’वर ठेवलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरवर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार आणि अहमद पटेल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राज्यात राष्ट्रपती राजवट झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत काँग्रेस, राष्ट्रवादीनं शिवसेनेबद्दलची आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली. आता राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं आता आमच्याकडे बराच अवधी आहे. त्यामुळे आम्ही सवडीनं निर्णय घेऊ, असं म्हणत शरद पवारांनी शिवसेनेच्या पाठिंब्याबद्दल सावध पवित्रा घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढवलीय. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्याबद्दलचा निर्णयदेखील एकत्रच घेऊ, असं पवार म्हणाले.शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या विचारसरणीत फरक आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमांसह अनेक मुद्यांवर चर्चा गरजेची असल्याचंदेखील पवार यांनी म्हटलं. यावेळी काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी राज्यपालांच्या कारभारावर सडकून टीका केली. ‘राज्यपालांकडून मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करून मनमानी सुरू आहे. राज्यपालांनी बहुमताचा दावा करण्यासाठी भाजपा, शिवसेनेसह राष्ट्रवादीला निमंत्रित केलं. मात्र काँग्रेसला आमंत्रण देण्यात आलं नाही. राज्यपालांची ही कृती चुकीची आहे,’ असं पटेल म्हणाले. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला आहे. याबद्दलचा निर्णय राष्ट्रवादीशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचा पाठिंबा वेटिंगवरच; काँग्रेस-राष्ट्रवादीचा अंतिम निर्णय नाहीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 8:10 PM