मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची ही चर्चा सुरू आहे. यावर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असं म्हटलं आहे.
'शिवसेना आणि काँग्रेस यांची विचारसरणी ही अत्यंत वेगळी आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जनतेचा कौल मान्य करून विरोधी पक्षात बसावं. काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये' असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच कोणाला दूर ठेवावं आणि कोणाला जवळ करावं हे नेतृत्त्व ठरवेल असं ही त्यांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी असं म्हटलं आहे. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. निरनिराळे तर्क केले जातात. काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार की भाजपाला अशी शंका निर्माण झाली आहे. मला वाटतं ही शंकाच आहे. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. कुठल्याही धर्मावर, जातीवर भूमिका मांडणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊ शकत नाही. त्यांची विचारधारा वेगळी, आमची वेगळी आहे. 60 वर्षं धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर निवडणुका लढवल्या आहेत. आम्ही विरोधात बसून जनतेची सेवा करायला तयार असल्याचं देखील सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या वादावादीवर काँग्रेसची बारीक नजर असून उच्चपदस्थ सूत्रांनुसार महाराष्ट्रातील चार मोठे नेते पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यात प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण तसेच विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे.
राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं झाल्याचे एबीपी माझाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. त्यामुळे पुढच्या एक दोन दिवसांत राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल अर्धातास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. राऊत यांनी दिवाळीनिमित्त शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आक्रमक आहे. तसेच, सत्तेत समान वाटा मिळावा, यासाठी भाजपावर दबाव आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. संजय राऊत सत्तेच्या वाटपावरून भाजपावर सतत निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. सत्तेच्या पदांचे समसमान वाटप व्हावे. जे हक्काचे आहे, न्यायाचे आहे, असे संजय राऊत यांनी याआधी म्हटले आहे. याचबरोबर, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरू आहे.