मुंबई: अस्थिर परिस्थितीत यंत्रणा हाती असलेल्यांकडून फोडाफोडीचे प्रयत्न होतात. मात्र शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही. शिवसेना आमदारांच्या वाऱ्यालाही उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचं वैयक्तिक वैर नाही. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सत्ता स्थापनेसाठी काही जणांकडून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क साधला जात आहे, असा दावा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यावर शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क करण्याची हिंमत कोणीही करणार नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. त्यामुळे त्यांच्या वाऱ्यालाही कोणी उभं राहणार नाही. अस्थिरतेच्या काळात सत्ताधारी विविध हातखंडे वापरतात. मात्र शिवसेनेचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी विनाकारण विधानं करत नाहीत. माझा तो स्वभाव नाही. मी फक्त पक्षाची भूमिका मांडतो, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. मला ना मंत्री व्हायचंय, ना मुख्यमंत्री. मला वैयक्तिक अशी कोणतीही अपेक्षा नाही. मी केवळ शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतो, असं राऊत म्हणाले. भाजपा नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच 'गुड न्यूज' मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मुनगंटीवार वारंवार गुड न्यूज गुड न्यूज करत असतील, तर कोण कुठे जन्माला आलंय ते पाहावं लागेल, असा टोला त्यांनी लगावला. सुधीर मुनगंटीवार शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची गोड बातमी घेऊ शकतात, असंही राऊत यांनी म्हटलं.
महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 10:05 AM