महाराष्ट्र निवडणूक 2019: संभाव्य आघाडीविरोधात ऑनलाइन याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 03:00 AM2019-11-18T03:00:01+5:302019-11-18T06:18:26+5:30
महायुतीला मतदान केलेल्या मतदारांचा विश्वासघात झाल्याचा दावा
मुंबई : महाराष्ट्र शिवसेनाकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे भाजप व शिवसेनेच्या युतीला मतदान केलेल्या मतदारांची फसवणूक शिवसेनेकडून होत असल्याचा आरोप करत काही मतदारांनी याबाबत ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. चेंजडॉटओआरजी यावर ही याचिका दाखल करण्यात आली असून राज्यपालांना मेलद्वारे याबाबत माहिती देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते किशोर चितळे यांनी दिली आहे.
शिवसेना व भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन वाद उफळल्याने राज्यात महायुतीला बहुमत मिळूनही त्यांचे सरकार मात्र स्थापन होऊ शकले नाही. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण देऊनही यापैकी कोणताही पक्ष सत्ता स्थापन करु शकला नाही. परिणामी राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली व सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे भाजप व शिवसेनेच्या युतीला मतदान केलेल्या मतदारांची फसवणूक झाल्याची भावना काही मतदारांमध्ये झाली असून त्यांनी याविरोधात जनजागृती करण्यासाठी ऑनलाइन याचिका दाखल केली असून त्याला सुमारे चार हजारपेक्षा अधिक जणांनी स्वाक्षरी करुन पाठिंबा दिला आहे. तसेच नवी आघाडी करण्याऐवजी या पक्षांनी निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना पुन्हा सामोरे जावे अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. राज्यपालांनी या अनैसर्गिक आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.