मुंबई - वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरणारे गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वंचितमध्ये असताना पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून सरकार विरोधात रान उठवले होते. मात्र आता भाजपमध्ये जाताच पडळकरांच्या भाषणातून हा मुद्दा गायब झाला असून, कलम 370, तीन तलाकवर ते बोलताना पहायला मिळत आहे. माण-खटाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
राजकारणाच्या सुरुवातील महादेव जानकरांच्या रासपामध्ये, 2014 ची निवडणूक भाजपाकडून, 2019 लोकसभा वंचित बहुजन आघाडीकडून आणि आता पुन्हा 2019 विधानसभा निवडणूक भाजपाकडून असा पडळकर यांचा राजकीय प्रवास आहे. भाजप सोडल्यानंतर पडळकर यांनी धनगर समजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्षाला वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केला. तर पडळकर यांनी याचा मुद्द्यावरून राज्यभर सभा सुद्धा घेतल्या होत्या.
मात्र आता नुकतेच त्यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. तर भाजपमध्ये जाताच पडळकर यांना धनगर आरक्षणाचा विसर पडला असल्याचे बोलले जात आहे. माण-खटाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलताना पडळकर यांनी कलम 370,तीन तलाक,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौरे यावर भाषण ठोकले. त्यामुळे त्यांच्या भाषणाची चांगलीच चर्चा पहायला मिळत आहे.
या सभेत बोलताना पडळकर यांनी धनगर आरक्षणाचा कुठेचं उल्लेख केला नाही. कलम 370 मुळे काश्मीरमधील लोकांना कसा फायदा मिळणार याचा लेखा-जोखा त्यांनी यावेळी मांडला. त्यामुळे विरोधात असताना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलणारे पडळकर भाजपात येताच कलम 370, तीन तलाकवर बोलू लागले असल्याची चर्चा पाहायला मिळाली.