मुंबई : विधानसभा निवडणुकांचा प्रचार टिपेला पोहोचला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे वातावरण ढवळून निघत आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी गांधी-पवार कुटुंबावर जोरदार टीका केली, तर राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘कलम ३७०’ वरून भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. आम्हाला साधेभोळे समजू नका, असा इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या बंडखोरांना दिला. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत आम्ही उघड्यावर लढणारी माणसं आहोत, ही मॅच मी जिंकली आहे, असे वक्तव्य केले.
दरम्यान, भाजपने पाच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेने मात्र आपल्या बंडखोरांवर कारवाईचा बडगा न उगारल्यामुळे युतीत नाराजीचे चित्र आहे. काँग्रेसचे राजकारण गांधी परिवाराशिवाय पुढे जात नाही. शरद पवारांनीही मुलगी, पुतण्या, नातू व आप्तांना राजकीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला. भाजपमध्ये घराणेशाही नाही. घराणेशाही मुळात फोफावली केवळ गांधी, पवार कुटुंबामुळेच, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. ते धारणी (अमरावती) येथील प्रचारसभेत बोलत होते.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मौनीबाबा अशी संभावना करत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. शेजारी राष्ट्राच्या हल्ल्याविरुद्ध चकार शब्द न काढणाऱ्या पक्षाला देशाने हद्दपार करून राष्ट्रहित जोपासणाºया नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवून राष्ट्रवाद मजबूत केल्याचा दावा शहा यांनी केला.नाणारला शिवसेनेचा विरोधचकोकणातील जनतेची भावना जाणून नाणार रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला आहे. भविष्यातदेखील हा प्रकल्प कदापीही होऊ देणार नाही, असे सांगतानाच महाराष्ट्रामध्ये झालेली कर्जमाफीही शिवसेनेच्या भूमिकेमुळेच झाली आहे. यापुढील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून महाराष्ट्रातील शेतकºयांना कर्जमुक्त करणार, असा दावा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी वळीवंडे येथील प्रचारसभेत केला.मी मॅच जिंकली आहे-उद्धवआम्ही बंद हॉलमधली माणसं नाही. उघड्या मैदानात लढणारी माणसं आहोत. बोलतो, पाहतो, करतो असं बोलणारी शिवसेना नाही. जे बोलतो ते करतो. मी मॅच जिंकलेली असून माझी धावसंख्याही ठरलेली आहे, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावती येथे केला.काश्मीरमध्ये कोण शेती करणार - पवारनिवडणूक महाराष्टÑ विधानसभेची आणि भाजपाचे नेते ३७० कलमावर मतं मागत आहेत. अमित शहा म्हणत असतील की आता काश्मीरमध्ये शेती शक्य आहे. मला सांगा इथले घरदार सोडून काश्मीरमध्ये कोण शेती करायला जाईल? अशी विचारणा शरद पवार यांनी केली. कुणी मुद्द्याचं बोलतच नाही. महागाई, शेतकºयांचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या, ढासळती अर्थव्यवस्था यावर बोला की, असा टोलाही पवारांनी लगावला.भाजपचा शिवसेनेला इशाराआम्ही साधे-भोळे आहोत, असे कोणाला वाटत असेल, तर त्यांनी लक्षात ठेवावे की, भलेभलेही आम्हाला घाबरतात. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी युतीधर्म पाळावा आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांचा प्रचार करावा, अन्यथा आमचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा इशारा चंद्रकांत पाटील दिला. मंडलिकांनी सोयीचे राजकारण संपवावे. कारण शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यात आठ जागा जिंकायच्या आहेत, याची आठवणही पाटील यांनी करून दिली. एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, हे लक्षात असू द्या, असा दमच त्यांनी दिला.