मुंबई: जवळपास दोन आठवड्यांपासून शिवसेना, भाजपामध्ये सुरू असलेला सत्ता वाटपाचा संघर्ष आज संपण्याची चिन्हं आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपावरून सुंदोपसुंदी सुरू आहे. या संघर्षाला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. तर दुपारी 2 वाजता भाजपा नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.दोन आठवड्यांपूर्वी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यातील मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला. मात्र सत्तापदांच्या वाटपावरून शिवसेना, भाजपामध्ये संघर्ष निर्माण झाला. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला हा संघर्ष आज संपण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. भाजपानं दिलेल्या प्रस्तावावर या बैठकीत निर्णय होऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आमदारांची बैठक होईल. या बैठकीत राज्यामध्ये सध्या निर्माण झालेला सत्तावाटपाचा तिढा, भाजपासोबत वाटाघाटी करण्याबाबत आमदारांची भूमिका, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दिल्यास त्याचे स्थानिक राजकारणावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम, भाजपाबाबत शिवसेना आमदारांची असलेली मतं याबाबत चर्चा होणार आहे. शिवसेनेसोबतच भाजपाच्या गोटातही वेगवान हालचाली सुरू आहेत. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांची भेट घेणार आहेत. यासाठी त्यांनी दुपारी 2ची वेळ मागितली आहे. या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. यानंतर भाजपा नेते पत्रकार परिषद घेणार आहेत. या सर्व घडामोडी पाहता सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. 24 ऑक्टोबरपासून निर्माण झालेली राजकीय कोंडी आज फुटू शकते.
महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेचा तिढा आज सुटणार? भाजपा नेते राज्यपालांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 8:39 AM