मुंबई : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबरला म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधी देण्याचे आधीच जाहीर केले आहे पण त्यामुळे दिवाळीसारख्या आनंदाच्या उत्सवकाळात पराभूत उमेदवार, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे हजारो समर्थक नक्कीच खूश नसतील. दिवाळीआधी मतदान आणि दिवाळीनंतर निकाल असे केले असते तर ते टाळता आले असते आणि निकालाच्या निमित्ताने येणारी राजकीय कटूता ऐनदिवाळीत आली नसती.अर्थात, आता निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, आयोगाने आधीच या बाबतचा विचार करायला हवा होता, असे विविध पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. २०१४ मध्ये १५ आॅक्टोबरला मतदान झाले आणि १९ आॅक्टोबरला निकाल जाहीर करण्यात आला होता. मतदान आणि निकाल यात तीन दिवसांचे अंतर होते. यावेळी ते दोनच दिवसांचे आहे. मतदानानंतर किती दिवसांनी मतमोजणी झाली पाहिजे या बाबतचा काही नियम नाही. परिस्थितीनुसार त्या बाबतचा निर्णय आयोगाला घेता येतो.येत्या दहा-बारा दिवसात प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. मुंबईपासून गल्लीपर्यंत एकमेकांचे उणेदुणे काढले जाईल आणि २१ तारखेच्या मतदानापर्यंत ही कटूता शिगेला पोहोचलेली असेल. शेवटी निवडून येणार ते २८८ जणच. राज्याच्या निवडणूक रिंगणात उमेदवार आहेत, ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात आहेत. याचा अर्थ पराभूत होणाऱ्या उमेदवारांची संख्या २९५१ असेल. एवढे उमेदवार, त्यांचे कुटुंबीय, नातेवाइक आणि हजारो समर्थकांची दिवाळी केवळ निकालामुळे गोड होणार नाही.पराभूत उमेदवारांच्या समर्थकांचा हिरमोडदसरा आणि दिवाळीच्या दरम्यान होणारी निवडणूक आणि निकाल यामुळे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची यंदा खºया अर्थाने दिवाळी आहे असे म्हटले जात आहे. तथापि, असे हजारो निष्ठावंत कार्यकर्ते आजही आहेत की जे पदरमोड करून आपापल्या पक्षाचा प्रचार करतात. असे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांच्यासाठी झटले ते पराभूत झाल्यानंतर त्यांनाही दिवाळीचा फारसा आनंद नसेल.
Maharashtra Election 2019 : दिवाळीपूर्वीच्या निकालाने अनेकांच्या पदरी निराशा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 1:13 AM