मुंबई: आमदारांच्या फोडाफोडीचे आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा, अन्यथा माफी माफा, असं थेट आव्हान भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. भाजपानं कोणत्याही आमदाराशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे काँग्रेसनं त्यांचे आमदार सिद्ध करावेत. अन्यथा महाराष्ट्राची आणि स्वत: आमदारांची माफी मागावी, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या सर्व आरोपांचा त्यांनी इन्कार केला. राज्यातील सत्ता स्थापनेचा लवकरच सुटेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मात्र त्यासाठी आमदारांची फोडाफोड करणार नाही, असंदेखील ते म्हणाले. 'भाजपा नेहमी विचारांची लढाई लढते. आम्हाला आमदार फोडण्याची गरज वाटत नाही. असं राजकारण भाजपानं कधीही केलेलं नाही. काँग्रेस नेत्यांनी फोडाफोडीचे आरोप करून त्यांच्याच आमदारांवर अविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी आरोपाचे पुरावे द्यावेत. अन्यथा काँग्रेसनं स्वत:च्या आमदारांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी', असं थेट आव्हान त्यांनी दिलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील फोडाफोडीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही. पंधरा वर्षे शिवसेना विरोधी पक्षात होती. मात्र तरीही त्यांचा एकही आमदार फुटला नाही, असं मुनगंटीवार म्हणाले. शिवसेनेनं दुसऱ्या कारणानं आपले आमदार एकत्र ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन आठवडे उलटूनही सरकार स्थापन करू न शकलेल्या भाजपानं आता फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 'भाजपाकडून काँग्रेसच्या आमदारांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इगतपुरीच्या आमदारांना काही जणांनी फोन केला होता. मात्र कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीआधी आमदार फोडणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत जनतेनं धडा शिकवला आहे. त्यामुळे आता कोणी फुटून बाहेर निघण्याचा प्रयत्न केल्यास सर्व विरोधी पक्ष मिळून एकच उमेदवार देऊन त्याला राजकारणातून संपवू. जनतेशी केली जाणारी प्रतारणा खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसनं 'ते' आरोप सिद्ध करावेत, अन्यथा...; भाजपाचं खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 2:26 PM