भारतीय हवाईदलाने मंगळवारी सऱ्याच्या मुहुर्तावर पहिले राफेल लढाऊ विमान औपचारिकरीत्या स्वीकारले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची पूजा करण्यात आली होती. लढाऊ विमानाची पूजा करताना त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवण्यात आल्याने विरोधकांसह सोशल मीडियावर देखील जोरदार टीका करण्यात आली होती. त्यातच आता एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील विमानाच्या चाकांखाली लिंबू ठेवल्याने सरकारवर टीका केली आहे.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात नवीन लढाऊ विमान दाखल झाल्याचा मला आनंद आहे. मात्र जेव्हा राफेल खरेदी केले तेव्हा विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यात आले. मी जर एखादी नवीन गाडी घेतली असती तर लिंबू कापून त्याचे सरबत बनवून लोकांना पाजलं असतं असं सांगत सरकारच्या या कृतीवर निशाणा साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी आज(गुरुवार) परभणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अली खान यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
राफेल विमान भारताला सुपूर्द करण्याचा कार्यक्रम नैर्ऋत्य फ्रान्समध्ये मेरिग्नॅक येथील दसॉल्ट एव्हिएशन फॅसिलिटी येथे झाला तेव्हा संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले देखील उपस्थित होते. राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची छोटीशी शस्त्र पूजा केली गेली. या विमानातून राजनाथ सिंह यांनी उड्डाण करण्याआधी त्यांनी विमानाच्या चाकांखाली लिंबू ठेऊन पूजा केल्याने विरोधकांसह सोशल मीडियावर देखील टीका करण्यात आली होती.