नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सगळेच पक्ष प्रचाराला लागले आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झगडत आहे तर भाजपा-शिवसेना येणाऱ्या निवडणुकीत विजय आपलाच सांगत विरोधकांना टोला लगावत आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे प्रचाराला वेगळी रंगत आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निवडणुकीत सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला मतदान करावं ही भूमिका लोकांसमोर मांडली आहे. या राज्याला विरोधी पक्षाची गरज आहे. लोकांचा राग व्यक्त करण्यासाठी आम्हालाच मतदान करा असं राज ठाकरे लोकांना आवाहन करत आहे. अशातच नितीन गडकरींनी राज ठाकरेंवर भाष्य करत राज ठाकरे हे सक्षम नेते आहे, त्यांच्यात क्षमता आहे त्यामुळे जनतेने त्यांचा विचार करावा असं विधान केलं आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, लोकशाहीत सत्तारुढ पार्टीसोबत विरोधी पक्षही तितकाच महत्वाचा आहे. लोकांचा प्रतिसाद राज ठाकरेंना चांगला आहे, फक्त त्यांची राजकीय भूमिका चुकली. विरोधी पक्ष बनण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे. निश्चित जनतेने त्यांचा विचार केला पाहिजे अस मत त्यांनी माध्यमाशी बोलताना केलं आहे.
तसेच आयारामांमुळे भाजपाचं कल्चर बदलेल अन्यथा त्यांचे कल्चर बदलेल, शेवटी काळाच्या ओघात पक्ष विस्तार करण्यासाठी माणसं जोडावी लागतात. नागपूरमध्ये जेवढे पदाधिकारी आहेत त्यातील ९० टक्के काँग्रेसचे आहेत. काँग्रेस मोठा पक्ष होता. त्यातून ते पक्षात आले त्यांनी पक्षाची संस्कृती स्वीकारली असं म्हणत गडकरींनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर भाष्य केलं आहे.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत भाजपाला अनुकुलता आहे, शिवसेनेसोबतची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. पक्ष मोठा झाला की सगळेच जण प्रवेश करतात. नागपूर दक्षिण मतदारसंघात आशिष देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात लढत होणार आहे. आशिष देशमुख जसं मॉर्निंग वॉक करतात तसं पक्ष बदलत असतात. देवेंद्र फडणवीस सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही नितीन गडकरींनी व्यक्त केला.