यदू जोशी
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. विविध राजकीय पक्षांचा प्रचार काही तासांत संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे. राज ठाकरेंना विरोधी पक्षाची तरी भूमिका मिळेल का? याबाबत देवेंद्र फडणवीसांनी राज यांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला वाटते की राज अधिक प्रक्टिकल आहेत. मला सत्ता द्या असं म्हणणं प्रासंगिक नाही हे लक्षात आल्यानं त्यांनी विरोधी पक्षाचा मार्ग पत्करला. विरोधी पक्षांची विश्वासार्हता आज कधी नव्हे एवढी घसरली आहे. त्याचा फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो पण मतदार त्यांना ती भूमिकाही देतील असे वाटत नाही असा टोला राज यांना लगावला आहे.
तसेच लोकसभेला त्यांनी जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला तिथे आघाडीचा पराभवच झाला होता. बारामतीकडून त्यांचा वापर होतोय हे आम्ही त्यावेळी सांगत होतो पण त्यांना ते पटत नव्हते. आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालविल्या जाताहेत हे कदाचित आता त्यांना कळलं असणार अशा शब्दात फडणवीसांनी राज यांना चिमटा काढला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं.
या निवडणुकीनंतर शरद पवार राजकीयदृष्ट्या संपतील?असं कोणी संपत नसतं पण, सत्तेचा उपयोग करून सत्ता आणायची , सत्तेसाठी काहीही करायचं हा गेल्या काही वर्षांत पवारांनी आणलेला भ्रष्ट संस्कृतीचा पॅटर्न संपेल. तो लोकांना पसंत पडेल असं वाटत नाही.
''राज्य बँकेच्या घोटाळ्यात शरद पवार यांचा संबंध''
निवडणुकीत चुरस नाही असं म्हणता तर पंतप्रधानांसह एवढा फौजफाटा का उतरवला भाजपने?पंतप्रधानांच्या अधिक सभा व्हायला हव्या होत्या, असे मला वाटते. मतदारांना गृहित धरणे योग्य नाही. तुम्ही तसे केले तर मग मतदारही तुम्हाला गृहित धरू शकतील. आमच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सरकारसाठी अनुकूल असे वातावरण आहे. निकालात ते दिसेलच.
तुम्ही केंद्रात जाणार अशी चर्चा नेहमीच असते?मला माझा पक्ष सांगेल त्याक्षणी मी दिल्लीत जाईन. उद्या पक्षानं म्हटलं घरी बस तर घरी बसेल.आता जेवढं मला राजकारण समजत त्यानुसार माझी राज्यात गरज आहे. पक्षालाही वाटतं की मी महाराष्ट्रातच राहावं. त्यामुळे मी इथे आहे आणि राहीन.