मुंबई - विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचं चित्र आहे. भाजपा १०२ जागा, शिवसेना ५७ जागांवर आघाडी आहे. काँग्रेस ४७ जागा, राष्ट्रवादी ५३ जागांवर आघाडी मिळाली आहे. मात्र या सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपा-शिवसेना महायुतीमधील ६ मंत्र्यांना जनतेने पराभूत केलं आहे.
महाआघाडीतील राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदारसंघात कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांना ९५ हजार ७२५ मते पडली तर अनिल बोंडे यांना ८५ हजार ९५३ मते पडली. देवेंद्र भुयार हे अमरावतीत जिल्हा परिषद सदस्य आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते. अनिल बोंडे या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर भाजपाकडून २०१४ मध्ये पुन्हा निवडून आले. यंदा बोंडे हॅट्रिक करणार का याकडे लक्ष होतं. मात्र देवेंद्र भुयार यांनी बोंडे यांचा दारुण पराभव झाला आहे.
विदर्भाचा कॅलिफोर्निया' अशी ओळख असलेल्या मोर्शी मतदारसंघातून मावळते कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव भाजपला मोठा धक्का देणारा ठरला आहे. देवेंद्र भुयार हा अवघ्या तीस वर्षांचा आक्रमक तरुण त्यांच्याविरुद्ध निवडून आला. देवेंद्रला तिकीट दिल्यामुळे 'रिलॅक्स' झालेल्या कृषिमंत्र्यांनी ‘यापूर्वी मी सत्तर हजार मतांनी निवडून आलो, आता दीड लक्ष मतांनी निवडून येऊन नवा विक्रम करणार’ अशा गर्जना करणे सुरू केले होते.
राजकारणातला दांडगा अनुभव, दिमतीला कॅबिनेट मंत्रिपद असतानाही देवेंद्रने मारलेली मुसंडी राज्याचे लक्ष वेधणारी ठरली आहे. देवेंद्र भुयारांना तिकीट देण्यासाठी राजू शेट्टी यांनी पराकोटीचा हट्ट धरला होता. त्यांचा तो हट्ट भुयारांनी सार्थकी लावला. दमदार आंदोलनांसाठी भुयार मोर्शी मतदारसंघाला सुपरिचित आहेत. आता मतदारांनी आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात घातल्यामुळे मतदारांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. मोर्शी मतदारसंघात माळी मतांचा आकडा ४९ हजारांच्या घरात आहे. ती मते या निवडणुकीत निर्णायक होती. बोंडे यांचे भाजपजनांशी असलेले संबंध आणि भाजपने त्यांच्यासाठी केलेले काम, हे मुद्देही महत्त्वाचे आहेत.